खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आता रस्त्यांचाच सर्व्हे; खड्डे बुजवण्यास प्राधान्य, मास्टिक तंत्रज्ञानाचा वापर

मुंबईतील रस्त्यांची पावसाळ्याआधी दुरुस्ती, खड्डे बुजवण्याचे काम करताना केवळ खड्डे न बुजवता मास्टिक सरफेस तंत्रज्ञानाने रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये केवळ खड्डा न बुजवता संपूर्ण रस्त्याची सरफेस मास्टिक पद्धतीने दुरुस्ती करण्यात येणार आहे.
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आता रस्त्यांचाच सर्व्हे; खड्डे बुजवण्यास प्राधान्य, मास्टिक तंत्रज्ञानाचा वापर

मुंबई : वरुणराजाचे आगमन दोन महिन्यांवर येऊन ठेपले आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण होऊ नये, यासाठी मुंबईतील रस्त्यांचे सर्व्हे करण्याचे निर्देश पालिकेच्या संबंधित यंत्रणांना दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्त रस्ते करण्याचे उद्दिष्ट असून खड्डा दिसताच मास्टिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते बुजवण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये, यासाठी नालेसफाईच्या कामावर जोर दिला आहे. त्याप्रमाणे पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी खड्डेमुक्त रस्ते यावर पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. हे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे धोरण पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. यामध्ये सुमारे ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी पालिकेकडून कार्यवाहीदेखील सुरू आहे. मात्र शहरातील १३६२ कोटींची निविदा काढूनही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पुन्हा निविदा मागवण्यात आल्या आहेत तर दोन्ही उपनगरातील ९१० कामांपैकी ७८७ कामे अजून सुरू झालेली नाहीत. पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांची चाळण होऊ नये, यासाठी ज्या-ज्या ठिकाणी खड्डे असतील ते पावसाळ्याआधी बुजवण्यात येतील, असे बांगर यांनी सांगितले.

मास्टिक सरफेस तंत्रज्ञानाने रस्त्यांची दुरुस्ती

मुंबईतील रस्त्यांची पावसाळ्याआधी दुरुस्ती, खड्डे बुजवण्याचे काम करताना केवळ खड्डे न बुजवता मास्टिक सरफेस तंत्रज्ञानाने रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये केवळ खड्डा न बुजवता संपूर्ण रस्त्याची सरफेस मास्टिक पद्धतीने दुरुस्ती करण्यात येणार आहे. मास्टिक डांबरीकरणात १८० ते २०० अंश डिग्री सेल्सिअस तापमान असते. ते सर्वात जलद गतीने स्थिर होते. त्यामुळे अपयशी ठरलेल्यामुळे कोल्डमिस्कऐवजी मास्टिक अस्फाल्टचा वापर करणार.

रस्त्यांची सद्यस्थिती

मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी सहा हजार कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. यात मुंबईत ३९७ किमी अंतरात ९१० रस्त्यांच्या कामांपैकी आतापर्यंत फक्त १२३ कामे सुरू झाली असून उर्वरित ७८७ कामांना सुरुवातही झालेली नाही. यातील फक्त ११ कामे पूर्ण झाली असून ४ प्रगतिपथावर आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in