अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण: मॉरिसच्या बॉडीगार्डला न्यायालयीन कोठडी

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण: मॉरिसच्या बॉडीगार्डला न्यायालयीन कोठडी

हत्येनंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. हा संपूर्ण प्रकार फेसबुक लाईव्ह सुरू असताना झाला होता.

मुंबई : शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा माजी नगरसेवक मुलगा अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिसभाई याचा बॉडीगार्ड अमरेंद्र अशोककुमार मिश्रा याला लोकल कोर्टाने २६ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अमरेंद्रला मंगळवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याची पोलीस कोठडी न वाढविता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गेल्या आठवड्यात अभिषेक घोसाळकर यांची मॉरिसने त्याच्या कार्यालयात गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. हा संपूर्ण प्रकार फेसबुक लाईव्ह सुरू असताना झाला होता. त्यामुळे पोलिसांनी मॉरिसविरुद्ध हत्येसह आत्महत्येचा गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. हा तपास हाती येताच मॉरिसचा बॉडीगार्ड असलेल्या अमरेंद्र मिश्रा याला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत होता.

त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या वतीने अमरेंद्रच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. कट शोधण्यासाठी पुढील तपास बाकी आहे, या गुन्ह्यांत तो लाभार्थी आहे का, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का, याचा तपास करण्यासाठी आणखीन पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र अमरेंद्रच्या वकिलांनी त्याला आक्षेप घेत पोलीस कोठडीत असताना अमरेंद्रने त्याच्याकडील सर्व माहिती पोलिसांना दिली आहे. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणे चुकीचे असल्याचे सांगून त्याला न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी विनंती केली होती. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर अमरेंद्रला २६ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in