ठाकरे गटातील गँगवारमुळेच अभिषेक घोसाळकरांची हत्या; उदय सामंत: घोसाळकर आणि मॉरिसमध्ये समझोता कोणी घडवून आणला

अभिषेक घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरोन्हाचे उदात्तीकरण ठाकरे गटाने केले.
ठाकरे गटातील गँगवारमुळेच अभिषेक घोसाळकरांची हत्या; उदय सामंत: घोसाळकर आणि मॉरिसमध्ये समझोता कोणी घडवून आणला

प्रतिनिधी/मुंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे. मात्र, घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रकार विरोधक करत आहेत, तो अत्यंत दुर्दैवी आहे. या दोघांमध्ये मी नगरसेवक होणार की तू, हा वाद होता. ठाकरे गटातील अंतर्गत गँगवॉरमुळे मॉरिस नोरोन्हा याने घोसाळकरांची हत्या केली असल्याचा आरोप मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. मॉरिस नोरोन्हाचे उदात्तीकरण ‘सामना’मधून करण्यात येत असल्याचे सांगत, सामंत यांनी पुराव्यादाखल सामनाची कात्रणेच सादर केली. घोसाळकर आणि मॉरिस यांच्यात समझोता घडवून आणणारी व्यक्ती कोण आहे, याचाही तपास व्हायला हवा, असेही उदय सामंत म्हणाले.

घोसाळकरांची हत्या करणारा मॉरिस नोरोन्हा याने चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकार हे माफियागिरी आणि गुंडगिरीला पाठबळ देत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी केला होता. या आरोपाचे खंडन उदय सामंत यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून गुन्हेगारीच्या घटनांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारला वारंवार लक्ष्य केले जात आहे. अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरोन्हा यानेही वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी मॉरिस नोरोन्हा हा कशाप्रकारे उद्धव ठाकरे गटाशीच संबंधित होता, हे सविस्तरपणे सांगितले. सामंत यांनी घोसाळकर यांची हत्या ठाकरे गटातील अंतर्गत वादातूनच घडल्याचे म्हटले.

अभिषेक घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरोन्हाचे उदात्तीकरण ठाकरे गटाने केले. मॉरिस नोरोन्हाच्या सामाजिक कार्याचा गौरव आणि त्याला पाठिंबा दिला जात होता. मॉरिसच्या कामाला 'सामना'तून, तर घोसाळकर कुटुंबीयांच्या कामाला मातोश्रीवरून पाठिंबा दिला जात होता. राज्यात कुठलीही घटना घडली की त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्र्यांना जबाबदार धरणे चूक आहे. आरोप-प्रत्यारोप होतात, हे मी समजू शकतो.

समझोता करणारी व्यक्ती कोण?

‘‘मी कुणाला आदर्श मानतो आणि मी कुणाला आदर्श मानून भविष्यात काम करणार आहे,’’ असे ट्विट्स देखील मॉरिसने सोशल मीडियावर केली आहेत. म्हणून अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र सरकारला विनाकारण लक्ष्य करण्याऐवजी मॉरिस नोरोन्हा आणि अभिषेक घोसाळकर यांना आपापसात समझोता करायला लावणारी व्यक्ती कोण? याचा शोध घेतला पाहिजे. या दोघांना फेसबुक लाईव्ह करायला सांगून तुमच्यातील वाद मिटवा, असे कोणी सांगितले होते? घोसाळकर आणि नोरोन्हा यांच्यात समझोता झाला होता. मात्र, हे दोघे आमचे कार्यकर्ते नव्हते. फेसबुक लाईव्हपूर्वी या दोघांची कुणाशी चर्चा झाली होती, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही उदय सामंत यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in