
महागाईचा पारा दिवसेंदिवस चढत असून, गणेशोत्सव उत्सवालाही ‘जीएसटी’चा फटका बसणार आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सव साजरा धुमधडाक्यात साजरा करता आला नव्हता; मात्र यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करता यावा, यासाठी गणेशोत्सवातील आवश्यक सेवांवरील ‘जीएसटी’ तातडीने रद्द करा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने राज्य सरकारकडे केली आहे.
राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने सुरू राहावा, असे वाटत असेल, तर मंडळांना पूरक वातावरण निर्माण करणे, त्यांना करातून सवलती मिळणे आवश्यक आहे. गणेशोत्सवातील आवश्यक सेवांवरील ‘जीएसटी’ कर रद्द केल्यास सार्वजनिक मंडळांचा आर्थिक भार कमी होईल. बचत आणि मिळालेली वर्गणी अधिक लोकोपयोगी कामांसाठी वापरली जाऊ शकते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ‘जीएसटी’ नोंदणी नसल्याने त्यांनी ‘जीएसटी’चा भुर्दंड का सहन करावा, असा प्रश्नही बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मंडळांना ‘जीएसटी’मुळे आर्थिक चणचण
मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि सगळ्या सणांवर निर्बंध आले. त्यात यंदा कोरोनाचा धोका कमी आहे, असे वाटत असतानाच महागाईने जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस याच्या जोडीला आता प्रत्येक गोष्टीवर ‘जीएसटी’ लावण्यात आला आहे. कोरोनामुळे मंडळांकडे आवश्यक तो निधी जमा झाला नाही, तसेच सार्वजनिक मंडळांनी कोरोनाच्या काळात सढळ हस्ते बांधिलकीतून सर्वसामान्यांना विविध प्रकारची मदत केली आहे. मुंबईत १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत; मात्र त्यातील काही मोजक्याच मंडळांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. बाकीच्या मंडळांना ‘जीएसटी’मुळे आर्थिक चणचण भासू लागल्याने खर्चाला कात्री लावावी लागते आहे.