अन्नधान्यांवरील जीएसटी रद्द करा,मुंबई ग्राहक पंचायतीची पंतप्रधानांनकडे मागणी

ग्राहकांची मूलभूत जीवनावश्यक गरज असल्याने त्यावर जीएसटी आकारण्यालाच मुंबई ग्राहक पंचायतीने आक्षेप घेतला आहे
अन्नधान्यांवरील जीएसटी रद्द करा,मुंबई ग्राहक पंचायतीची पंतप्रधानांनकडे मागणी

आवेष्टित पिशवीतून विकले जाणारे धान्य, डाळी आणि कडधान्यांवर येत्या सोमवार, १८ जुलैपासून पाच टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावण्यात येणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी जाहीर केले. याविरोधात मुंबई ग्राहक पंचायतीने अन्नधान्यांवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

धान्ये, डाळी आणि कडधान्ये ही कोणत्याही ग्राहकांची मूलभूत जीवनावश्यक गरज असल्याने त्यावर जीएसटी आकारण्यालाच मुंबई ग्राहक पंचायतीने आक्षेप घेतला आहे. तसेच गेली दोन वर्षे फळे, भाज्या, दूध, पाव यांसारख्या अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि स्वयंपाकाचा गॅसच्या किमतीसुद्धा सातत्याने वाढत असल्याने सर्वसाधारण ग्राहकांचे आधीच कंबरडे मोडले असल्याने केंद्र शासनाने आता डाळी, कडधान्यांवर पाच टक्के जीएसटी लावून त्यांचे जगणे आता आणखी कठीण करू नये. अन्नधान्ये, कडधान्ये, डाळींवरील हा पाच टक्के जीएसटी त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी करणारे सविस्तर निवेदन मुंबई ग्राहक पंचायतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे, अशी माहिती मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यवाह अनिता खानोलकर यांनी दिली.

तसेच गेल्या दोन‌ वर्षांत स्वयंपाकाच्या गॅसची किंमत ही ५९४ रुपयांवरून १,०५३ रुपयांपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्य‌ ग्राहक हैराण झाला आहे. त्यामुळे गॅसची किंमतसुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी करून महागाईत होरपळत असलेल्या ग्राहकांना दिलासा द्यावा, अशीही मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in