गर्भपाताचे वाढते प्रमाण चिंताजनक!

मुंबईत ३ वर्षांत गर्भपाताच्या ८० हजार घटना, अंधेरी आणि सायन भागात सर्वाधिक प्रमाण असून पालिकेतील आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर
गर्भपाताचे वाढते प्रमाण चिंताजनक!

महिलांना गर्भपात करण्याचा अधिकार आहे; मात्र एकट्या मुंबईत वर्षाला गर्भपाताच्या २० ते २५ हजार गर्भपाताच्या घटना घडत आहेत. जानेवारी २०२० ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत तब्बल ८० हजार १८३ गर्भपाताच्या घटना घडल्याची धक्कादायक माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, गर्भपाताच्या सर्वाधिक घटना अंधेरी पश्चिम येथे ८,३८५ तर एफ उत्तर विभागातील सायन भागात २,४९९ घटना घडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

गर्भात असलेल्या मुलांमध्ये काही दोष दिसून येणे, गरोदर काळात महिलेला योग्य आराम न मिळणे, अनैतिक संबंध अशी गर्भपाताची विविध कारणे असू शकतात. कमी वयामध्ये अबॉर्शन म्हणजेच गर्भपात होण्याची तसेच गर्भपात करून घेण्याची संख्या वाढत चाललेली आहे. ही गोष्ट प्रामुख्याने मुंबईमध्ये दिसून आलेली आहे. हा संशोधन किंवा ही येणारी बातमी खरोखरच चिंताजनक आणि दुःखदायक आहे. गर्भपाताच्या घटना टाळण्यासाठी खबरदारी घेणे, सतर्कता ठेवणे आहे. तसेच पालक व मुलांमधील संवाद कमी होणे, वयात आलेले मुले कुठे जातात, दिवसभर काय करतात याकडे पालकांचे लक्ष नसते, ही मोठी खेदाची बाब आहे, असे मत मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, मुंबईत ३४८ या सर्व घटनांमध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी की, १५ वर्षांखालील १७ गर्भपात आहेत. त्यामुळे गर्भपाताकडे आता संवेदनशीलपणे पाहणे आणि त्याविषयी जनजागृतीवर भर देण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्रसूतीच्या २०व्या आठवड्याआधीच बाळाचा मृत्यु होणे यालाच गर्भपात (मिसकॅरेज) असे म्हणतात. साधारणत: गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच गर्भावस्थेच्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये गर्भपाताचा धोका अधिक असतो. गर्भपाताची लक्षणे आणि संकेत योग्य वेळी ओळखलीत, तर त्यावर उपचार करणे आणि हा धोका टाळणे अधिक सोपे जाऊ शकते.

हे आहेत गर्भपाताचे संकेत?

- गर्भपाताचा सर्वात पहिला संकेत रक्तस्त्राव हा असतो, पण प्रसूतीत होणाऱ्या प्रत्येक रक्तस्त्रावाचा अर्थ गर्भपात हा नसतो. प्रसूतीच्या पहिल्या तिमाहीत ब्लीडिंग होणे अत्यंत साधारण गोष्ट आहे.

- अनेक प्रकरणांत कपड्यांवर फक्त रक्ताचे डाग पडतात. गर्भपातामध्ये आधी रक्तस्त्राव हळूहळू होतो आणि नंतर वाढतो. याला तुम्ही नॉर्मल पिरीयड्सपेक्षा जास्त म्हणू शकता. जर रक्तस्त्रावाचा रंग तपकिरी ऐवजी गडद लाल असेल आणि तुम्हाला स्नायूंमध्ये अवघडलेपणा जाणवत असेल तर तो गर्भपाताचा संकेत असू शकतो.

- बहुतांश वेळा प्रेग्नेंसीच्या पहिल्या तिमाहीत मळमळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. पण जर प्रेग्नेंसीच्या दुसऱ्या तिमाहीत प्रवेश करण्याआधीच तुमच्या उलट्या होणे बंद झाले, तर हा गर्भपाताचा संकेत असू शकतो.

कार्यवाहीची नोंद नाही!

मुंबईतील नोंदणीकृत एमटीपी सेंटरमध्ये एमटीपी कायदा, १९७१ कायदयानुसार केलेले गर्भपात वैध असल्याने अश्या गर्भपातांसाठी कोणतीही फौजदारी कार्यवाही होत नाही. २०२० ते मार्च २०२३ पर्यंत एमटीपी कायदयाच्या १९७१ नुसार, कोणत्याही एमटीपी केंद्रावर फौजदारी कार्यवाही झाल्याची नोंद नाही, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, गर्भपाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी पालिका जनजागृती करणार असून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत एमटीपी केंद्रांना नियमित भेट देण्यासह तपासणी करण्यात येईल.

२४ आठवड्यापर्यंत वाढ

राज्यसभेत १७ मार्च २०२१ रोजी वैद्यकीय गर्भपात सुधारणा विधेयक आवाजी मतदानाने संमत झाले होते. यापूर्वी स्त्रीला २० आठवड्यांचा गर्भ असतानाच गर्भपात करून घेता येत होता. पण या नव्या कायद्यामुळे तो कालावधी काही विशिष्ट शारीरिक आणि मानसिक प्रकरणात आता २४ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

गरोदर काळात मुलीची तब्येत कळते!

गर्भपात हा विविध कारणांमुळे होत असला तरी आता नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे लगेच कळते की, गर्भपात असलेल्या मुलाची प्रकृती कशी आहे. त्यात गर्भपातासाठी १२ वरून २४ आठवडे केले आहेत. त्यामुळे गर्भपाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

- डॉ. अशोक आनंद, जे. जे. रुग्णालय

या परिस्थितीत महिला करू शकते गर्भपात!

- गर्भवती महिलेच्या जीवाला धोका असेल.

- महिलेच्या मानसिक, शारीरिक आरोग्याला धोका पोहोचणार असेल.

- जन्माला येणाऱ्या बाळात व्यंग असेल.

- महिलेला बलात्कारातून गर्भधारणा झालेली असेल.

- विवाहित किंवा लिव्ह इनमध्ये असलेल्या महिलेच्या बाबतीत संततीनियमनाच्या साधनांनी काम केले नसेल.

logo
marathi.freepressjournal.in