
भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुंबई महापालिका प्रशासनाने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत असून, या अभियानाअंतर्गत ३५ लाख निवासस्थाने व आस्थापनाना ५० लाख मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात येत असून, आतापर्यंत १० लाखांहून अधिक राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले आहे; मात्र त्यातील ३० ते ३५ टक्के राष्ट्रध्वज सदोष असून, डिझाईन चुकीची असून रुंदी-लांबी एक समान नसल्याचा आरोप मुंबईकरांनी केला आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबईत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जाणार आहे. या अभियानात मुंबईतील सर्व निवासस्थानांवरती भारतीय एकात्मतेचे प्रतीक असलेला तिरंगा राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी महापालिकेकडून घराघरात, दुकानात, कार्यालयाच्या इमारती येथे तिरंगा झेंडा वाटप सुरू झाले आहे. पालिकेकडे ३५ लाख राष्ट्रध्वज आले असून, त्या ध्वजांचे वाटप पालिकेच्या २४ कार्यालयांत करण्यात आले आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ११ ऑगस्टपर्यंत घर, दुकान आणि कार्यालये आदी ठिकाणी जाऊन त्याचे वाटप केले जात आहे. जे ध्वज सदोष आहेत ते पुरवठादाराकडून बदलण्यात येत आहेत, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांनी सांगितले.