डोंगराळ भागातही मुबलक पाणी;१७ हजार मीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकणार

डोंगराळ भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करत मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी तब्बल १६ हजार ८५३ मीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत.
डोंगराळ भागातही मुबलक पाणी;१७ हजार मीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकणार

मुंबई : मुंबईतील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम पालिकेच्या जल विभागाने हाती घेतले आहे. डोंगराळ भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करत मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी तब्बल १६ हजार ८५३ मीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. कुर्ला, भांडुप, घाटकोपर, विक्रोळी आदींसह ५८ डोंगराळ भागात या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे या भागातील पाणीटंचाई येणाऱ्या काळात दूर होणार आहे. या कामांसाठी सुमारे ४१ कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुंबईला दररोज ३ हजार ९५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत असला तरी, उपनगरातील डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना अनेकदा पाणीच मिळत नाही. त्यामुळे आपली तहान भागवण्यासाठी या भागातील नागरिकांना डोंगरपायथ्याशी येऊन पाणी भरावे लागत आहे. विशेष म्हणजे पाण्याने भरलेली भांडी डोक्यावर घेऊन डोंगर चढावा लागत असल्यामुळे नागरिकांचे विशेषत: महिलांचे अक्षरश: हाल होत आहेत. डोंगराळ भागात मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचा नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. तरीसुद्धा डोंगराळ भागातील पाणीटंचाईची समस्या सुटलेली नाही. मात्र आता पालिकेने डोंगराळ भागातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ५८ ठिकाणी १६ हजार ८५३ मीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

घाटकोपर पश्चिम काथोडीपाडा येथील उंचावर वसलेल्या लोकवस्तीसाठी तसेच कुर्ला तसेच घाटकोपरमधील अन्य ठिकाणच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी ५० मि.मी. ते ३०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी टाकण्यात येणार आहेत. यात कुर्ला किस्मत नगर, काजूपाडा, टॅक्सीमेन कॉलनी, मॅच फॅक्टरी लेन, खैरानी रोड, टाकीयावॉर्ड, विक्रोळी सर्वेक्षर मंदिर मार्ग, पार्कसाईट, घाटकोपर आझाद नगर, भटवाडी, बर्वेनगर, भीमनगर, काजूपाडा, चिराग नगर, पळशीवाडी, सीजीएस कॉलनी, एलबीएस रोड, किरोळ गाव, गोळीबार रोड, अंकुश गावडे मार्ग जंक्शन, संत ज्ञानेश्वर मार्ग, पंत नगर, गुरुदत्त मंदिर मार्ग, वल्लभलेन, राजावाडी, कामराज नगर या डोंगराळ लोकवस्तीचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in