भाडेवाढ न करता सर्व लोकल करणार एसी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची योजना

मुंब्रा येथील रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता अधिकाधिक वातानुकूलित लोकल प्रवासी सेवेत आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे. प्रवाशांच्या सेवेत एसी लोकल सेवा आणताना जादा तिकीट दराचा भार प्रवाशांवर पडू नये यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भाडेवाढ न करता सर्व लोकल करणार एसी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची योजना
Published on

मुंबई : मुंब्रा येथील रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता अधिकाधिक वातानुकूलित लोकल प्रवासी सेवेत आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे. प्रवाशांच्या सेवेत एसी लोकल सेवा आणताना जादा तिकीट दराचा भार प्रवाशांवर पडू नये यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला ११ वर्षे पूर्ण झाल्याने या ११ वर्षांतील विकासकामांची माहिती देणारे ‘सेवा आणि सुशासनाची अकरा वर्षे’ पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, ‘आत्मनिर्भर भारत ते विकसित भारताकडे जाण्याची ही ११ वर्षे आहेत. परिवर्तनशील दशक पूर्ण करत एका दशकाची ही वाटचाल आहे’. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यात प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी ‘एक तिकीट’ योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंब्रा येथील रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. ‘पीक अर्वस’मध्ये शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करणे शक्य झाले आहे. परंतु, खासगी आस्थापनात थोडीफार अडचण येत असली तरी त्यावर केंद्र व राज्य सरकार तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात नवीन ५ हजार बसेस उपलब्ध होणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

बंद दरवाजांच्या लोकलमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा असेल!

लोकलचे दरवाजे बंद केल्यास लोक गुदमरतील हे आम्हालाही समजते. त्यामुळे लोकलचे दरवाजे बंद असले तरी हवा खेळती रहावी यासाठी दरवाजात व लोकलच्या टपावर व्हेंटिलेटरची सुविधा असणार आहे. असे सांगत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला.

मुंब्रा येथील रेल्वे दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाहेरून येणारे लोंढे अपघातास कारणीभूत असल्याचा आरोप केला होता. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले की, मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी बाहेरून येणाऱ्या लोंढ्याचे नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे!

विधानसभा निवडणुकीतील निकालात ‘फिक्सिंग’ असा लेख काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लिहिला होता. राहुल गांधी यांच्या लेखानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, राहुल गांधी यांनी खरे तर निवडणूक आयोगाला पत्र द्यायला हवे होते. तरी मी ६० पानांचे उत्तर दिले असून त्याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे, असे आवाहन फडणवीस यांनी राहुल गांधी यांना केले.

पात्र धारावीकरांना मिळणार हक्काचे घर

धारावीचा पुनर्विकास होऊ नये यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेस आरोप-प्रत्यारोप करत आहे. परंतु, धारावीचा पुनर्विकास हा आमचा संकल्प असून पात्र धारावीकरांना धारावीतच हक्काचे घर मिळणार, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

५५ कोटी जनधन खाती

मोदी सरकारने गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला, जनतेला मोफत अन्नधान्य दिले जाते. मोदी सरकार येईपर्यंत नळ जोडणी कमी होती, ती आता १५ कोटींवर गेली आहे. ५२ कोटी लोकांना मुद्रा योजनेचे कर्ज मिळाले आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या मुलांना १४ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. ५५ कोटी जनधन खाती, अन्न सुरक्षा ५१ कोटी, जीवन ज्योती २३ कोटी, आयुष्मान ७७ कोटी खाती तयार केली असून आरोग्य लाभ दिले आहेत. आतापर्यंत मोदी सरकारने महाराष्ट्राला लाभ दिलेला निधी ४३ लाख कोटी रुपयांपर्यंत जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महिलांवर खास लक्ष, माता मृत्यू दर घटला

नियंत्रणरेषेवर पहिल्यांदा महिलांची तुकडी तैनात करण्याचे काम करण्यात आले आहे. ७३ टक्के घरे महिलांच्या नावावर आहेत. ‘लखपती दीदी’ ३ कोटी तयार झाल्या आहेत, १ कोटी महाराष्ट्राने बनवण्याचे ठरवले आहे. ९० लाख महिलांचे बचत गट तयार करत त्यांना कार्यरत करण्याचे काम केले आहे. माता मृत्यू दर १६० वरून ८० पर्यंत खाली आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

१० वर्षांतील निधी एकाच वर्षात महाराष्ट्रात

महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात रेल्वेचे पावणेदोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. यूपीएच्या काळात १० वर्षांत जो निधी दिला तितका निधी एकाच वर्षात मोदी सरकारने दिला. सहा लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामे झाली आहेत. १ लाख घरे देण्याचा विक्रम केला. जी यादी होती ती सर्व समाप्त होत आहे. नवीन यादी तयार करत सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे, असे फडणवीस म्हणाले.

महायुतीचाच महापौर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीकडून योग्य ती तयारी सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेत महायुतीचे सरकार सत्तेत येणार आणि महायुतीचाच महापौर असणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in