Mumbai : मध्य रेल्वेवर भविष्यात AC लोकल वाढणार; मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांचा विश्वास

काही लोकल गाड्यांना दोन वातानुकूलित डबे लावण्याची योजना होती. मात्र हा प्रयोग तूर्तास स्थगित आहे.
Mumbai : मध्य रेल्वेवर भविष्यात AC लोकल वाढणार; मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांचा विश्वास
Published on

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकल सुरू करण्यास प्रथम विरोध झाला. मात्र प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकल सुरू झाल्या आहेत. या लोकलला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बदलता काळ आणि वातावरणानुसार मध्य रेल्वेवर भविष्यात वातानुकूलित लोकल धावतील, असा विश्वास मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी गुरुवारी व्यक्त केला.

दैनिक 'नवशक्ति' आणि 'फ्री प्रेस जर्नल'च्या कार्यालयाला भेट देऊन नीला यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा केल्या. यावेळी नीला यांनी विविध विषयावर दिलखुलास चर्चा केली. ते म्हणाले की, मध्य रेल्वेने नुकतेच नवीन वेळापत्रक लागू केले आहे. यामध्ये एकही लोकल कमी न करता १५ गाड्या लांब अंतरापर्यंत चालवल्या जात आहेत. मंत्रालय परिसरातील कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांनी सायंकाळी ६.१२ नंतर कसाऱ्याकडे जाणारी लोकल चालविण्याची मागणी केली होती. त्यामुळे अंबरनाथ आणि टिटवाळा लोकलमध्ये बदल करण्यात आले. तर पीक अवर्समध्ये धीम्या आणि जलद मार्गावरील लोकलमध्ये बदल करण्यात आला.

रेल्वेला सर्व प्रवासी सारखे आहेत. मेल/एक्स्प्रेसप्रमाणेच लोकलमधून प्रवास करणारे प्रवासीदेखील आम्हाला महत्त्वाचे वाटतात. लोकलसाठी मेल/एक्स्प्रेस उशिरा चालविल्यास त्यांनाही त्रास होतो. त्यामुळे रेल्वेला सर्व प्रवाशांचा विचार करावा लागतो. उपलब्ध पायाभूत सुविधांवर अधिकाधिक सेवा चालवून प्रवाशांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासन अहोरात्र मेहनत घेत असते, असेही नीला म्हणाले. लोकल मार्गाला अद्यापही पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे लोकलवर प्रवाशांचा मोठा ताण येत आहे. दररोज सुमारे ३७ लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात, तर सुमारे २० ते ३० टक्के प्रवासी विनातिकीट प्रवास करत असावेत, असा अंदाज असल्याचेही ते म्हणाले. मेट्रो, विमान प्रवासावेळी प्रवासी शिस्तबद्ध वागतात. मात्र लोकल प्रवासावेळी त्यांच्या मानसिकतेत आणि वागणुकीमध्ये मोठा बदल अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव आसलेल्या जागेवर जाऊन लोक बसत असल्याकडेही नीला यांनी लक्ष वेधले.

सीएसएमटीमध्ये अनेक कामे प्रगतिपथावर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये (सीएसएमटी) प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. १४ ते १८ नंबर प्लॅटफॉर्म २४ डब्यांचे आहेत, तर जुलै महिन्यात १० आणि ११ नंबर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली गेली आहे. १२ आणि १३ नंबर प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम डिसेंबर अखेरीस पूर्णत्वास जाईल. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांची क्षमता ३० टक्क्यांनी वाढणार आहे.

लोकलला वातानुकूलित डबे जोडणे आव्हानात्मक

काही लोकल गाड्यांना दोन वातानुकूलित डबे लावण्याची योजना होती. मात्र हा प्रयोग तूर्तास स्थगित आहे. तांत्रिकदृष्ट्या हे काम आव्हानात्मक आहे. वातानुकूलित लोकलचे दरवाजे बंद होणे आणि उघडणे यास साध्या लोकलपेक्षा अधिक वेळ लागतो. ज्यामुळे त्यामागील लोकलना देखील थोडा अधिक वेळ लागतो.

logo
marathi.freepressjournal.in