पश्चिम रेल्वेवरील एसी फेऱ्या आणखी वाढणार; मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांची माहिती

मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी पश्चिम रेल्वेवर सध्या ९६ वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या असून त्यात आणखी वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली. दैनिक ‘नवशक्ति-फ्री प्रेस जर्नल’च्या वतीने आयोजित परिसंवादात त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
पश्चिम रेल्वेवरील एसी फेऱ्या आणखी वाढणार; मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांची माहिती
Published on

मुंबई : मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी पश्चिम रेल्वेवर सध्या ९६ वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या असून त्यात आणखी वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली. दैनिक ‘नवशक्ति-फ्री प्रेस जर्नल’च्या वतीने आयोजित परिसंवादात त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

विनीत अभिषेक यांनी पश्चिम रेल्वेच्या विविध उपक्रमांची यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, ‘पश्चिम रेल्वेवर जादा एसी गाड्या सुरू करण्याचा आमचा मानस आहे. एका एसी गाडीमुळे ११ ते १२ फेऱ्या सुरू करता येऊ शकतात. जशा गाड्या वाढतील, तशा फेऱ्याही वाढतील. एसी गाड्यांचे दरवाजे बंद असल्याचा फायदा प्रवाशांची सुरक्षा राखण्यात होतो. मेट्रोसह अन्य सेवांच्या तुलनेत एसी लोकलचे भाडे सध्या परवडण्याजोगे आहेत.’

मागील पाच-सात वर्षात मुंबईतील बहुसंख्य स्थानकांवर एस्कलेटर्स, इलिव्हेटर्स उभारण्याची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. ‘अमृत भारत स्टेशन्स’अंतर्गत रेल्वे स्थानकांना नवा लूक देण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रयत्नशील आहे. मालगाड्यांसाठी वेगळे मार्ग तयार करण्याबरोबरच नव्या प्रवासी रेल्वे वाढवून प्रतीक्षा यादी कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहील. सिग्नलिंग सिस्टीम सक्षम केली, रेल्वे मार्गाचे आधुनिकीकरण केले, तर रेल्वेच्या प्रवासी कालावधीत बचत होईल. त्या दिशेने आपले प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम रेल्वेवर सध्या दरदिवशी ३०-३१ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. ‘मेरा टिकट, मेरा इनाम’ योजना आपण सुरू केली. त्यातून जवळपास ४ कोटींचा महसूल रेल्वेला मिळाला. तसेच, मुंबई विभागात विनातिकीट प्रवाशांकडून सुमारे नव्वद कोटी वसूल केले असल्याचे त्यांनी सांगितले. न्यूयॉर्क, बॉस्टनमधील रेल्वेच्या तुलनेत आपण भारतात चांगली सेवा देत आहोत. भारतातील वाढते रेल्वे अपघात लक्षात घेता, प्रत्येक जीव अनमोल आहे व त्याविषयी संवेदना दाखविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

फलाटांवरील पंखे, दिव्यांसाठी सेन्सर!

रेल्वेच्या फलाटावरील पंखे, दिवे सेन्सर नियंत्रित करण्यात येतील का असे विचारले असता, ही अतिशय चांगली सूचना असल्याचे सांगून ती अंमलात आणण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. रेल्वेत प्लास्टिकच्या पिशव्या, खाद्यपदार्थांचे पॅकेज टाकणे अथवा खिडक्यांमधून तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रवाशांनीच स्वयंशिस्त पाळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंखे आहेत, तिथे बाकडे नाहीत व बाकडे आहेत, तिथे पंखे नाहीत, ही समस्याही सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. मागील चार पाच वर्षांत डिजिटल तिकीटचे प्रमाण वाढत असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

logo
marathi.freepressjournal.in