वरुणराजाच्या आव्हानासाठी मायानगरी सज्ज!

घराच्या छतावर ताडपत्री टाकण्यासह डांबरीकरणाला वेग ; छत्री, रेनकोटच्या दरात यंदा १० ते १२ टक्क्यांनी वाढ
वरुणराजाच्या आव्हानासाठी मायानगरी सज्ज!

वरुणराजाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. पावसाळ्यापूर्वी मुंबईकरांना कुठल्याही समस्येला तोंड द्यावे लागू नये, यासाठी मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे पावसाळ्यात सखल भागात पाणी तुंबण्याचा धोका सतावत असताना घराच्या छतातून पावसाच्या पाण्याची गळती रोखण्यासाठी प्लास्टिकच्या ताडपत्री टाकण्यात येत आहेत. घराच्या छतावर व इमारतींच्या टेरेसवर डांबरीकरण करण्याची धावपळही सुरू आहे. पावसापासून बचावासाठी मुंबईकरांनी छत्री रेनकोट खरेदीसाठी दुकानात गर्दी केली आहे. यंदा छत्रीच्या दरात १० ते १२ टक्के वाढ झाल्याने खरेदीसाठी येणारे ग्राहक चिडचिड करत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. एकूणच मुंबईची तुंबई होऊ, नये यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे, तर घरातील पाणी गळती रोखण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत.

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबू नये, यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील आहे. दुसरीकडे घराच्या छतातून पाणी गळती रोखण्यासाठी मुंबईकरांनी कौलांवर टेरेसवर प्लास्टिकची ताडपत्री व डांबराचा कवच टाकण्यास सुरुवात केली आहे. पावसापासून बचावासाठी मुंबईकरांनी छत्री, लहान मुलांसाठी रेनकोट खरेदीसाठी दुकानात गर्दी केली आहे. शाळा सुरु होण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक असून मुलांसाठी रेनकोट खरेदीसाठी दुकानात गर्दी होत आहे. महागाईने कहर केला असून छत्र्यांची किंमत ही १५० ते एक हजारांपर्यंत, तर रेनकोट २०० ते १५०० हजारांपर्यंत आहे. पावसाळ्यात बचावासाठी छत्री, रेनकोट खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या छत्र्या बाजारात उपलब्ध झाल्या असून बच्चेकंपनीसाठी रंगबिरंगी छत्र्यांचे आकर्षण ठरत आहे.

बदलत्या वातावरणामुळे पाऊस लहरी झाला आहे. त्यामुळे कधी पाऊस तर कधी उन असे वातावरण अनुभवायला मिळते. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. तर मुंबईत हाताच्या बोटावर राहिलेल्या चाळीतील रहिवाशांनी घराच्या छतावर प्लास्टिक व डांबरीकरण करण्यास सुरुवात केली आहे. छतातून पडणारे पावसाचे पाणी रोखणे, कोसळण्याच्या अवस्थेत आलेल्या भिंतीची डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे. पाऊस म्हटला की, घराच्या छतातून पाणी गळती, इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये फॉल्ट राहिल्यास शॉर्टसर्किटची भीती, पावसाचे पाणी घरात तुंबण्याची भीती, धोकादायक भिंत कोसळण्याच्या धास्तीने मुंबईकरांच्या चेहऱ्यावर दर पावसाळ्यात चिंतेचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे पावसाळा पूर्व छतावर डांबरीकरण, मोडकळीस आलेली भिंतीची डागडुजी, घरातील कोबा करणे, घराबाहेरील लहान झाडांची छाटणी करणे, घरात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी दुरुस्ती करणे, छतावर प्लास्टिक टाकणे आदी महत्वाची कामे पावसाळापूर्वी करण्यासाठी मुंबईकर कामाला लागले आहेत.

सध्याचे छत्री दर

- साधी छत्री १५० ते १८० रुपये

- चांगल्या क्वालिटीच्या छत्री २०० ते ८०० रुपये

सध्याचे रेनकोट दर

- कमीत कमी ३५० ते ८०० रुपये

खरेदीसाठी गर्दी वाढली!

मुलांच्या सुट्ट्या संपत आल्या असून पावसाळा जवळ आला आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी छत्री रेनकोट खरेदीसाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे. ब्रॅण्डेड कंपनीच्या छत्रीचे दर ५५० पासून दोन हजारांपर्यंत दर आहेत. लहान मुलांचे रेनकोट ४०० ते ८०० रुपयांपर्यंत असून मोठ्यांचे रेनकोट ७६० ते दोन हजारांपर्यंत आहेत. काही प्रमाणात छत्री रेनकोटचे दर वाढले असले तरी लोकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे, असे चेनत ड्रेसेसच्या (दादर पश्चिम) दुकानदाराने सांगितले.

महागाईचा फटका!

पावसाचे एन्ट्री होण्याच्या महिनाभर आधीच लोक छत्री रेनकोट खरेदीसाठी येतात. यंदा ही पावसाळ्यापूर्वी खरेदीसाठी लोकांची गर्दी होत आहे. परंतु छत्र्यांच्या दरात १० ते १२ टक्के वाढ झाली असून १५० रुपयांची छत्री सध्या १७० ते १८० रुपयांत उपलब्ध आहे. छत्र्यांचे दर वाढल्यामुळे खरेदीसाठी येणारे ग्राहक दुकानदारांवर भडकतात. त्यामुळे छत्री, रेनकोट खरेदीसाठी ग्राहक येत आहेत, मात्र दरवाढीमुळे थोडी चिडचिड करतात.

- निमेश शहा, अमूल स्टोअर्स, दादर पश्चिम

logo
marathi.freepressjournal.in