बीडीडी चाळ, पत्रा चाळ पुनर्विकासला गती; ५०० कोटी रुपये पुन्हा म्हाडाच्या खात्यात जमा

म्हाडातर्फे ५०० कोटी रूपयांचा निधी धारावी पुनर्वसन प्रकल्पाला सुपूर्द करण्यात आला.
बीडीडी चाळ, पत्रा चाळ पुनर्विकासला गती; ५०० कोटी रुपये पुन्हा म्हाडाच्या खात्यात जमा

मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पातील सेक्टर १ ते ५ चा विशेष हेतू कंपनीमार्फत एकत्रित विकासाकरिता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार धारावी पुनर्वसन प्रकल्पाला रेल्वेची जागा संपादित करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) स्वनिधीतून दिलेले २०० कोटी व ‘म्हाडा’ने महाराष्ट्र निवारा निधीतून उपलब्ध करून दिलेला ३०० कोटी रूपयांचा निधी धारावी पुनर्वसन प्रकल्पातर्फे ‘म्हाडा’ला परत करण्यात आला आहे.

म्हाडाला स्वनिधीतून दिलेला निधी परत आल्यामुळे ‘म्हाडा’च्या स्वनिधीतून सुरू असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, गोरेगाव येथील सिद्धार्थनगर (पत्रा चाळ) पुनर्विकास प्रकल्प यासारख्या प्रकल्पांना अधिक गती मिळण्यास मदत होणार असून, म्हाडामार्फत मुंबईसह राज्यभरात विभागीय मंडळांद्वारे परवडणाऱ्या दरातील गृहनिर्मितीला चालना मिळणार आहे. सदर निधी परत मिळावा यासाठी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा विशेष कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी विशेष प्रयत्न केले. हा निधी परत मिळाल्याने ‘म्हाडा’ स्वनिधीतून सुरू असलेल्या प्रकल्पांना अधिक गती मिळण्यास मदत होणार असल्याचे मत जयस्वाल यांनी व्यक्त केले आहे.

धारावी पुनर्वसन प्रकल्पातील सेक्टर १ ते ५ या सर्व सेक्टर्सचा विशेष हेतु कंपनीच्या माध्यमातून एकत्रित विकास करण्यासंदर्भात ५ नोव्हेंबर, २०१८ रोजी शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात आली. या मंजुरीत धारावी अधिसूचित क्षेत्रालगत असलेल्या व धारावी अधिसूचित क्षेत्रातील भारतीय रेल्वेच्या मालकीच्या एकूण अंदाजित ४६ एकर जमिनीच्या उपलब्धतेसंदर्भात रेल्वे मंत्रालयाशी समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्या दरम्यान २४ फेब्रुवारी २०१९ रोजी बैठक झाली. या बैठकीत रेल्वे मंत्रालयाने विचाराधीन जमीन धारावी पुनर्वसन प्रकल्पातील सेक्टर १ ते ५ च्या विशेष हेतु कंपनीमार्फत एकत्रित विकासाच्या अनुषंगाने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.

२४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या बैठकीनुसार धारावी अधिसूचित क्षेत्रालगतच्या रेल्वेची जमीन संपादित करण्यासाठी रेल्वेला ८०० कोटी रुपये आगाऊ भरणा करण्यासाठी त्यातील २०० कोटी रुपये म्हाडाने उपलब्ध करून देणे, ३०० कोटी रुपये महाराष्ट्र निवारा निधीतून उपलब्ध करून देणे व ३०० कोटी रुपये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने उपलब्ध करून द्यावी असे आदेश महाराष्ट्र शासनाने २८ मेस२०१९ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे दिले. त्यानुसार म्हाडातर्फे ५०० कोटी रूपयांचा निधी धारावी पुनर्वसन प्रकल्पाला सुपूर्द करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in