
मुंबई : मुंबईच्या बांधकाम क्षेत्रातील बाजाराने २०२४ मध्ये ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. वर्षात १ लाख ४१ हजारांहून अधिक मालमत्ता नोंदणी झाल्या आहेत. गेल्या १३ वर्षांतील ही सर्वाधिक नोंदणी झाली असल्याचे नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालात म्हंटले आहे.
मुद्रांक शुल्क संकलनाद्वारे मालमत्ता नोंदणीतून मिळणारे उत्पन्न वर्षानुवर्षे १२ टक्के वाढून १२ हजार १६१ कोटी इतके झाले आहे. तर २०२३ मध्ये १० हजार ८७१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. २०२४ च्या नोंदणीकृत मालमत्तांमध्ये ८० टक्के निवासी मालमत्तांचा समावेश होता. तर उर्वरित २० टक्के अनिवासी मालमत्ता होत्या, असे नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालात नमूद केले आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये १२ हजार ५१८ मालमत्ता नोंदणी झाल्या. ज्यामुळे राज्याच्या तिजोरीत १ हजार १५४ कोटी रुपयांचा वाटा जमा झाला. तर डिसेंबर २०२३ मध्ये १२ हजार २८५ नोंदणी झाली. त्यामधून ९३३ कोटी रुपयांच्या महसूल मिळाला आहे.
नाईट फ्रँक इंडियाच्या मते २०२४ मध्ये मुंबईत १ लाख ४१ हजार अधिक मालमत्ता नोंदणी झाल्या. ही नोंदणी १३ वर्षांतील सर्वाधिक आहे. २०२३ मध्ये ही नोंदणी १ लाख २६ हजार, २०२२ मध्ये १ लाख २२ हजार आणि २०२१ मध्ये १ लाख ११ हजार इतकी होती. २०२० आणि त्यापूर्वीच्या मालमत्ता नोंदणी ऐतिहासिकदृष्ट्या १ लाखांपेक्षा कमी आहेत.
पश्चिम आणि मध्य उपनगरांनी त्यांचे वर्चस्व कायम ठेवले आहे. एकूण बाजारातील वाट्यामध्ये ८६ टक्के वाटा दिला. उल्लेखनीय म्हणजे, मध्य उपनगरांमध्ये वाढत्या पुरवठ्यामुळे आणि अंतिम वापरकर्त्यांकडून वाढलेल्या स्वारस्यामुळे त्यांचा वाटा २९ टक्के वरून ३३ टक्के पर्यंत वाढला आहे.
लक्झरी घरांना वाढती पसंती
मुंबईच्या प्रीमियम गृहनिर्माण विभागात लक्षणीय वाढ झाली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये एकूण नोंदणीमध्ये २ कोटी आणि त्याहून अधिक किमतीच्या मालमत्तांचा वाटा २३ टक्के होता. जो डिसेंबर २०२३ मध्ये १८ टक्के होता. या विभागातील व्यवहार २ हजार ८७९ पर्यंत पोहोचले असून यामध्ये लक्झरी घरांना वाढती पसंती दर्शवते. ५० लाखांपेक्षा कमी किमतीच्या मालमत्तांचा बाजारातील वाटा २०२३ मध्ये ३० टक्के वरून २०२४ मध्ये २५ टक्के पर्यंत घसरला, जो उच्च-मूल्याच्या मालमत्तेकडे खरेदीदारांच्या पसंतींमध्ये बदल दर्शवितो, असे नाईट फ्रँक इंडियाने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.