
मध्य रेल्वे हद्दीत येणाऱ्या विद्याविहार स्थानकाजवळील रखडलेल्या पुलाच्या कामाला वेग येणार आहे. या पुलावर १०० मीटर लांबीचा पहिला गर्डर बसवण्याचे काम लवकरच केले जाणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने मध्य रेल्वेकडे मेगाब्लॉक घेऊन कामाची परवानगी मागितली आहे. दरम्यान, परवानगी मिळाल्यानंतर गर्डर टाकण्याचे काम होणार आहे. या उड्डाणपुलाच्या कामाचा एकूण खर्च हा १७८ कोटी रुपये आहे.
विद्याविहार रेल्वे स्थानकानजीक (घाटकोपर दिशेला)असलेला आणि रेल्वे रूळावरून जाणारा उड्डाणपूल जुना झाल्याने पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. या पुलाचा आराखडा २०१६ मध्ये तयार करण्यात आला होता. निविदांसह अन्य प्रक्रिया पूर्ण करून हा उड्डाणपूल २०२२ पर्यंत तयार होण्याची अपेक्षा होती. त्यानंतर मे २०२४ ही नवीन मुदत देण्यात आली. या पुलाच्या कामाला गती देण्यात येत असून पुलावर ९९.३० मीटर लांबीचे दोन गर्डर बसवण्यात येणार आहे. पहिला गर्डर बसवण्यासाठी मेगाब्लॉक घ्यावा लागणार असून त्यासाठी मध्य रेल्वेकडे प्रस्ताव पाठवला आहे. पहिला गर्डर बसवल्यानंतर दुसरा गर्डर बसवण्याचे काम सहा महिन्यात केले जाईल. त्यानंतर पुलाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूच्याही कामासाठी कंत्राटदार निवडण्यात आला आहे. ही सर्व कामे मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. रेल्वे रूळाच्या भागावरील पुलाची रुंदी २४.३० मीटर असून पुलाच्या दोन्ही बाजूला फूटपाथही असणार आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.