शापूरजी पालोनजी उद्योग समूहाचे प्रमुख सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन;उद्योगजगताला मोठा धक्का

वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
 शापूरजी पालोनजी उद्योग समूहाचे प्रमुख सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन;उद्योगजगताला मोठा धक्का

भारतीय उद्योगजगतातील सर्वात मोठा उद्योगसमूह असलेल्या टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि शापूरजी पालोनजी उद्योग समूहाचे प्रमुख सायरस मिस्त्री (५४) यांचे रविवारी दुपारी अपघाती निधन झाले. पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सूर्या नदीवरील पुलाच्या दुभाजकाला मिस्त्री यांची मर्सिडीज कार धडकली. अपघातानंतर कारच्या एअरबॅग उघडल्या; मात्र अपघात इतका भीषण होता की, एअर बॅग उघडूनही मिस्त्री यांच्यासह त्यांच्यासोबत कारमधून प्रवास करणारे जहांगीर दिनशॉ पंडोले यांचेही निधन झाले. तर अनायता पंडोले व दरियस पंडोले या जखमी झाल्या. मिस्त्री यांच्या निधनाने उद्योगजगताला मोठा धक्का बसला आहे.

मिस्त्री हे रविवारी दुपारी अहमदाबादहून मुंबईकडे येत असताना ३.१५ वाजण्याच्या सुमारास वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. अपघात घडला तेव्हा अनाहिता पंडोले या महिला कार चालवत होत्या. पंडोले या ब्रीच कँडी रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करतात. त्या जखमी झाल्या असून, त्यांना वापीच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात मृत पावलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव जहांगीर दिनशॉ पंडोले आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, “मिस्त्री हे कार क्रमांक एमएच-४७, एमबी-६७०५ मधून प्रवास करत होते. दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास सूर्या नदीच्या पुलावर त्यांच्या कारला अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच सर्व जखमींना कासा येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दोघांना मृत घोषित करण्यात आले.

गडकरींकडून श्रद्धांजली

सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “रस्ते अपघातात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त कळताच आपल्याला दु:ख झाले आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, “माझा भाऊ सायरसचे निधन झाले. विश्वासच बसत नाही.”

आरपीजी इंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका म्हणाले की, “मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त येताच धक्काच बसला. ते माझे चांगले मित्र होते. शापूरजी पालोनजी समूहाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.”

मर्सिडीज कार किती सुरक्षित?

सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात झालेली कार सर्वात महागडी मर्सिडीज बेंझ आहे. ही कार सर्वात सुरक्षित मानली जाते. अपघात झाला त्यावेळी कारमधील एअर बॅग उघडली होती. तरीही यात ती सायरस मिस्त्री यांचा जीव वाचवू शकली नाही. हा अपघात कसा झाला? याचा तपास पोलीस करत आहेत.

जूनमध्ये वडिलांचे निधन

२८ जून २०२२ रोजी सायरस यांचे वडील व ज्येष्ठ उद्योगपती पालोनजी मिस्त्री यांचे निधन झाले होते.

अपघाताच्या चौकशीचे फडणवीस यांचे आदेश

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. फडणवीस यांनी मिस्त्री यांच्या निधनाने धक्का बसल्याचे म्हटले आहे. या अपघाताची संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिल्याचे फडणवीस यांनी ट्विट केले आहे.

सायरस मिस्त्री यांचा अकाली मृत्यू धक्कादायक आहे. ते भारताच्या अर्थव्यवस्थेतील एक धाडसी उद्योगपती होते. मिस्त्री यांच्या निधनाने देशाच्या व्यापार आणि उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सायरस मिस्त्री यांचा मृत्यू धक्कादायक आहे. ते केवळ एक उद्योजकच नव्हते, तर तरुण, द्रष्ट्ये होते. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in