
शिवसंग्राम पक्षाचे नेते तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासह सर्वच प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या कारला अज्ञात ट्रकने धडक दिली. विनायक मेटे यांच्या अचानक जाण्याने मराठा समाजाच्या चळवळीची अपार हानी झाली आहे. मेटे यांच्या मृत्यूबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. मेटे यांच्या पार्थिवावर सोमवारी बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात रविवारी मुंबईत तातडीची बैठक आयोजित केली होती. मराठा मोर्चाचे समन्वयक तसेच
सामाजिक चळवळीचा आवाज हरपला - मुख्यमंत्री
“शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत धक्कादायक आणि वेदना देणारे आहे. त्यांच्या निधनाने मराठा आरक्षणासह, सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली.
प्रमुख नेते यांना या बैठकीचे आमंत्रण होते. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मेटे शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बीड येथून निघाले होते. ते पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास द्रुतगती महामार्गावरील माडप बोगद्याजवळ आले असता अज्ञात ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, त्यांच्या फोर्ड एन्डेव्हर या दणकट गाडीच्या डाव्या भागाचा चक्काचूर झाला. गंभीर बाब म्हणजे अपघातानंतर सुमारे तासभर मेटे यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकली नाही. त्यानंतर त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. मेटे यांचे शवविच्छेदन जे. जे. रुग्णालयात करण्यात आले असून, त्यांच्यावर सोमवारी बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचे अपघाताच्या चौकशीचे आदेश
विनायक मेटे यांच्या वाहनाला एका अज्ञात ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह फरार झाला आहे. मेटे यांचे चालक एकनाथ कदम यांना फारसे लागले नसले तरी त्यांचे शरीररक्षक राम ढोबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे मेटे यांना अपघातानंतर सुमारे तासभर कोणतीही मदत मिळू शकली नाही. वैद्यकीय उपचारांमध्ये कोणत्याही अपघातानंतरचे दोन तास अतिशय महत्त्वाचे असतात. त्यांना वैद्यकीय भाषेत ‘गोल्डन अवर्स’ म्हटले जाते. या कालावधीत अपघातग्रस्ताला तातडीची मदत मिळाली तर त्याचा जीव वाचण्याची शक्यता वाढत असते. नेमकी हीच मदत मेटे यांना मिळू शकली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेटे यांच्या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेच्या तपासासाठी रायगड पोलिसांच्या आठ टीम तयार करण्यात आल्या आहेत.
मराठा समाजाची हानी
विनायक मेटे यांच्या जाण्याने मराठा समाजाची हानी झाली आहे. विनायक मेटे हे मूळचे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या राजेगावचे होते. अतिशय सामान्य परिस्थितीतून ते पुढे आले होते. सर्वप्रथम ते पहिल्या शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात आमदार झाले. नंतर सलग पाच वेळ ते विधान परिषद सदस्य राहिले होते. शिवसंग्राम पक्षाचे ते प्रमुख होते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील ते प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारक समितीचे ते अध्यक्षदेखील होते. वैयक्ितक पातळीवर ते अतिशय सौम्य आणि मृदू स्वभावाचे होते. त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. विनायक मेटे यांच्या अपघाताची माहिती मिळताच प्रमुख नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोबतच रुग्णालयात गेले. संभाजीराजे छत्रपती, प्रवीण दरेकर यांच्यासह मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांनीदेखील रुग्णालयात धाव घेतली.
मराठा आरक्षण बैठक रद्द
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्व प्रमुख मराठा नेत्यांची बैठक मुंबईत आयोजित केली होती. दुपारी मुंबईत होणाऱ्या या बैठकीचे विनायक मेटे यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. बीड येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमालाही त्यांना उपस्थित राहायचे होते; मात्र मराठा समाजासाठीच्या बैठकीचे महत्त्व लक्षात घेऊन ते शनिवारी रात्रीच मुंबईला रवाना झाले. मुंबई जवळ आले असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला.