शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंगळवारी शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांच्या संपत्तीची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे, सर्वच मंत्री कोट्यधीश आहेत. त्यापैकी सर्वात श्रीमंत मंत्री भाजपचे मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा आहेत. त्यांची मालमत्ता ४४१ कोटींची आहे. तर सर्वात कमी म्हणजे दोन कोटींची संपत्ती पैठणचे शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्याकडे आहे. नव्या मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे.
शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांमध्ये भाजपचे नऊ मंत्री आहेत. यातील भाजपचे मंगलप्रभात लोढा हे सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. त्यांच्याकडे सर्वाधिक ४४१ कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. विजयकुमार गावित २७ कोटी संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. गिरीश महाजन २५ कोटी, राधाकृष्ण विखे २४ कोटी, अतुल सावे २२ कोटी संपत्तीचे मालक आहेत. सुधीर मुनगंटीवार यांची संपत्ती ११.४ कोटींची आहे. रवींद्र चव्हाण यांच्याकडे नऊ कोटींची मालमत्ता आहे. सुरेश खाडे हे चार कोटी संपत्तीसह भाजपमधील सर्वात कमी श्रीमंत असलेले मंत्री आहेत.
शिंदे गटाच्या नऊ मंत्र्यांपैकी तानाजी सावंत हे ११५ कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. ते शिंदे गटातील सर्वाधिक श्रीमंत मंत्री आहेत. ८२ कोटी संपत्तीसह दीपक केसरकर दुसऱ्या स्थानावर आहेत. २० कोटी संपत्तीसह अब्दुल सत्तार हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. शंभुराज देसाई १४ कोटी, दादा भुसे १० कोटी, संजय राठोड आठ कोटी, गुलाबराव पाटील पाच कोटी, उदय सामंत चार कोटी असा संपत्तीचा क्रम आहे. संदीपान भुमरे हे दोन कोटी संपत्तीसह मंत्र्यांपैकी सर्वात कमी श्रीमंत आहेत.