
मुंबई : हॉटेल व विमान तिकिट बुकींगसाठी पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या एका रेकॉर्डवरील आरोपीस अटक करण्यात एमएचबी पोलिसांना यश आले आहे. हार्दिक नलीन मेहता असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध अशाच प्रकारे विविध तीन पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. त्याच्या अटकेने अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार महिला ही व्यावसायिक असून, हार्दिक मेहता हा तिच्या परिचित आहे. त्याचा गुजरात येथे टूर टॅव्हेल्स आणि हॉटेल बुकींगचा व्यवसाय आहे. त्यामुळे तिने त्याला २१ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२२ या कालावधीत विमान तिकिटासह हॉटेल बुकींगसाठी एक लाख छत्तीस हजार रुपये दिले होते; मात्र हार्दिकने तिकिटासह हॉटेल बुकींग न करता तिने दिलेल्या पैशांचा अपहार करून फसवणूक केली होती. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना नऊ महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या हार्दिक मेहताला पोलिसांनी अटक केली.