भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस अटक; आरोपी पीडित मुलीचा मानलेला मामा असल्याचे उघड

अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ३२ वर्षांच्या आरोपीस मेघवाडी पोलिसांनी अटक केली.
भाचीवर लैंगिक अत्याचार  केल्याप्रकरणी आरोपीस अटक; आरोपी पीडित मुलीचा मानलेला मामा असल्याचे उघड
Published on

मुंबई : अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ३२ वर्षांच्या आरोपीस मेघवाडी पोलिसांनी अटक केली. आरोपी हा पीडित मुलीचा मानलेला मामा असून, त्याने त्याच्या जोगेश्‍वरीतील घरासह सिंधुदुर्ग येथील गावी तिच्यावर विनयभंगासह लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित १६ वर्षांची मुलगी आणि आरोपी जोगेश्‍वरीतील एका रुममध्ये राहतात. तो तिचा मानलेला मामा आहे. अनेकदा तो झोपताना तिच्याशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग करत होता. सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत त्याने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून तिला सतत धमकावत होता. मामाकडून सुरु असलेल्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून तिने गुरुवारी मेघवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मामाविरुद्ध लैंगिक अत्याचारासह विनयभंग, धमकी देणे आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच रात्री उशिरा त्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दिडोंशीतील विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in