राऊत बंधूंना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीस अटक

अटक झालेल्या आरोपीची संख्या पाच; धमकीमागील कारणाचा शोध सुरु
राऊत बंधूंना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीस अटक
Published on

मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कटातील मुख्य आरोपीस आरोपीस कांजूरमार्ग पोलिसांनी अटक केली. मयुर शिवाजी शिंदे असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मयुरच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या पाच झाली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत रिझवान झुल्फिकार अन्सारी, शाहिद अन्सारी, आकाश सुरेश पटेल, मुन्ना मोहम्मद मुन्ना मुस्ताक शेख या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. या धमकीमागील कारणाचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या आठवड्यात सुनिल राऊत यांना एका अज्ञात व्यक्तीने मोबाईवरुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. संजय राऊत यांनी सकाळची पत्रकार परिषद बंद करावी, नाहीतर त्यांच्यासह त्यांना गोळ्या घालू अशी धमकी या व्यक्तीने दिली होती. या धमकीनंतर त्यांच्या वतीने कांजूरमार्ग पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.

याप्रकरणी शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच १० जूनला इंटेरियलचे काम करणार्‍या शाहिद अन्सारी आणि रिक्षाचालक रिझवान अन्सारी या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर ११ जूनला रिक्षाचालक आकाश पटेल आणि १२ जूनला बेरोजगार असलेल्या मुन्ना शेख याला पोलिसांनी अटक केली होती. या चारही आरोपींच्या चौकशीतून मयुर शिंदे याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर बुधवारी १४ जूनला मयुरला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत मयुर हा पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

मयुर शिंदे हा पूर्वीश्रमीचा शिवसैनिक असून तो संजय राऊत आणि सुनिल राऊतचा कार्यकर्ता म्हणून परिचित आहे. राऊत बंधूंची सुरक्षा वाढविण्याच्या उद्देशाने त्याने हा संपूर्ण कट रचून इतर आरोपींना राऊत बंधूंना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे बोलले जाते. काही महिन्यांपूर्वीच त्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश घेतला होता. राष्ट्रवादीच्या एका नेत्यासह राऊत बंधूंसोबत काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. दरम्यान याबाबत पोलिसांकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यास नकार देण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in