
मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीची सोशल मीडियावर बदनामी करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी तरुणाला मालवणी पोलिसांनी अटक केली. आवेश सालाद सय्यद असे या तरुणाचे नाव असून तो नांदेडचा रहिवाशी आहे. तक्रारदार तरुणी एका खासगी कंपनीत कामाला आहे. तिच्या इंटाग्रामवर अकाऊंटवरील फोटोचा वापर करुन तिच्याविषयी एक आक्षेपार्ह स्टोरी असलेली पोस्ट एका तरुणाने सोशल मीडियावर व्हायरल केली होती. हा प्रकार तिच्या एका मैत्रिणीच्या निदर्शनास आला. तिने संबंधित पोस्ट पाहिल्यावर फोटोसह तिच्याविषयी अश्लील व आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे दिसून आले. या घटनेनंतर तिने मालवणी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आवेश सय्यदला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच या तरुणीची सोशल मिडीयावर बदनामी केल्याचे उघडकीस आले.