रॉबरीसह खंडणीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील आरोपीस अटक

पोलिसांना सतत गुंगारा देत होता
रॉबरीसह खंडणीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील आरोपीस अटक

मुंबई : रॉबरी आणि खंडणीच्या गुन्ह्यांतील राहुल ऊर्फ हर्ष ज्योतिंद्र व्यास या आरोपीस ओशिवरा पोलिसांनी अटक केली. राहुल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध बलात्कारासह खंडणीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेच्या भीतीने तो गेल्या सहा वर्षांपासून पोलिसांना सतत गुंगारा देत होता, अखेर त्याला अंधेरी येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सहा वर्षांपूर्वी त्याच्याविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात रॉबरीसह खंडणीच्या एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. ओशिवरा येथे एका संगणक प्रशिक्षकाच्या कार्यालयात रॉबरीच्या उद्देशाने सहा ते सातजणांनी प्रवेश करुन जिवे मारण्याची धमकी देत या प्रशिक्षकासह त्याच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. त्यांच्याकडे खंडणीची मागणी करून कार्यालयातील कॅश, मोबाईलसह इतर साहित्य घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच महिपाल मुलसिंग राजपुरोहित, अभिनव अमयसिंग गोयल, आरिफ अमीरअली दरेडिया, आशिष जितूभाई व्यास आणि सचिन अशोक गुरव या पाचजणांना पोलिसांनी अटक केली होती.

logo
marathi.freepressjournal.in