फसवणुकीच्या गुन्ह्यांतील आरोपीस दिड वर्षांनी अटक

या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने गोरेगाव पोलिसांना संबंधित तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाचे आदेश दिले होते
फसवणुकीच्या गुन्ह्यांतील आरोपीस दिड वर्षांनी अटक

मुंबई : फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका आरोपीस दिड वर्षांनी गोरेगाव पोलिसांनी अटक केली. शिवनरेश सृष्टीनारायण हरिजन असे या आरोपीचे नाव असून, तो अनेकांना एल ऍण्ड टी कंपनीचा कॉन्ट्रक्टर असल्याची बतावणी करत होता. या गुन्ह्यांत राकेश रामकरण तिवारी ऊर्फ मनोज तिवारी आणि अमोल बर्वेकर हे दोघेही सहआरोपी असून, या तिघांनी संगनमत करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

रामेश्‍वर विद्याचल सिंग हे गोरेगाव येथे राहत असून त्यांचा राकेश हा परिचित आहे. त्याने त्याला अमोल बर्वेकर हा एमएमआरडीएचा बडा अधिकारी तर शिवनरेश हा एल ऍण्ड टी कंपनीचा कॉन्ट्रक्टर आहे. शिवनरेशने एमएमआरडीएचे अनेक प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. त्यांच्या मदतीने त्याला गोरेगाव येथील राममंदिर, आस्मी कॉम्प्लेक्स या एमएमआरडीएच्या इमारतीमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले होते. या आमिषाला बळी पडून रामेश्‍वरसह त्याच्या आई-वडिलांनी राकेशसह अमोल आणि शिवनरेश यांना ऑगस्ट २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत सुमारे २० लाख रुपये दिले होते; मात्र दिलेल्या मुदतीत त्यांना फ्लॅट दिला नाही किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसेही परत केले नाही. त्यामुळे रामेश्‍वर सिंग यांनी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात एक याचिका सादर केली होती.

या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने गोरेगाव पोलिसांना संबंधित तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाचे आदेश दिले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच शिवनरेश हा पळून गेला होता. गेल्या दिड वर्षांपासून त्याचा पोलीस शोध घेत होते. अखेर त्याला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात पोलिसांना यश आले. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in