हत्येच्या गुन्ह्यांतील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

हत्येच्या गुन्ह्यांतील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

जखमी झालेल्या या दोघांनाही तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

मुंबई : आठ वर्षांपूर्वी घाटकोपर येथे निरज अशोक सिंग या २१ वर्षांच्या तरुणाच्या हत्येतील आरोपी कामरान अब्दुल जलील सिद्धीकीला याला विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या हल्ल्यात निरजचा मित्र विकास दिनकर इसावे हा गंभीररीत्या जखमी झाला होता. हत्येसह हत्येच्या प्रयत्नासह जबरी चोरीच्या गुन्ह्यांत कामरानला दोषी ठरविण्यात आले असून, तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निवृत्त पोलीस निरीक्षक याकूब मुल्ला यांनी सांगितले. ही घटना २६ मे २०१६ रोजी रात्री साडेदहा वाजता घाटकोपर येथील सुंदरबाग, इंदूनगर परिसरात घडली होती. निरज सिंग आणि विकास इसावे हे दोघेही अंधेरीतील साकिनाका परिसरात राहत होते. १६ मेला ते दोघेही सुंदरबाग, इंदूनगर परिसरातून जात होते. यावेळी एका अज्ञात तरुणाने त्यांच्याकडील मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न केला होता. या मोबाईलवरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातून या तरुणाने या दोघांवर त्याच्याकडील चॉपरने वार केले होते. त्यात ते दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. जखमी झालेल्या या दोघांनाही तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे निरज सिंग याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्न आणि जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली होती. यावेळी विशेष सत्र न्यायाधिश ए. सुब्रमण्यम यांनी कामरानला दोषी ठरवून त्याला आजीवन कारावासासह पाच हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in