
मुंबई : ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. विजय मानसिंग राजपूत असे या आरोपीचे नाव असून, अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गोरेगाव येथील एका खाजगी कंपनीत तक्रारदार तरुण कामाला आहे. जून महिन्यांत तो त्याच्या घरी असताना त्याला एका महिलेने पार्टटाईमची ऑफर देत त्यातून तो घरबसल्या चांगले पैसे कमावू शकतो, असे सांगितले होते. पार्टटाईम जॉबसह पैशांची गरज असल्याने त्याने तिला होकार दिला होता. त्यानंतर तिने त्याला एका रेस्ट्रॉरंटचे नाव सांगून गुगलवर हॉटेलच्या नावावर पॉझिटिव्ह रिव्ह्यू देण्यास सांगितले. त्याने रिव्ह्यू दिल्यानंतर त्याच्या बँक खात्यात कमिशनची रक्कम जमा झाली होती. त्यानंतर त्याला दिवसाला दहा ते पंधरा टास्क दिले जात होते. ते सर्व टास्क त्याने पूर्ण केले होते. काही दिवसांनी त्याला प्रिपेड टास्क देऊन त्यात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. या प्रिपेड टास्कमध्ये त्याला जास्त कमिशनचे गाजर दाखविण्यात आले होते. त्यामुळे त्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून विविध टास्कसाठी सुमारे साडेपाच लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. फसवणुकीचा प्रकार उघडकीस येताच त्याने बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती.