मुंबई : शहरात १९९३ साली दंगलीत एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून पळून गेलेल्या आरोपीस ३१ वर्षांनी आरएके मार्ग पोलिसांनी अटक केली. सय्यद नादीर शहा अब्बास खान असे या आरोपीचे नाव असून, तो त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आला होता. यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
१९९३ साली सय्यद व त्याच्या सहकाऱ्यांसह दंगल घडवून एका व्यक्तीचा हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. काही दिवस कारागृहात राहिल्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर तो पळून गेला होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान तो सतत गैरहजर राहत होता, त्यामुळे त्याच्याविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी करताना त्याला फरारी आरोपी म्हणून घोषित केले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. गेल्या ३१ वर्षांपासून त्याचा पोलीस शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरू असताना सय्यद हा शिवडीतील त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लिलाधर पाटील, श्याम बनसोडे, पल्लवी जाधव, सुरेश कडलग, अशोक लादे, निकम, मधुकर मंडलिक, दळवी, यादव यांनी शिवडी परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून सय्यदला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत तो दंगलीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. अटकेनंतर त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.