
मुंबई - ट्रकवर बोगस क्रमांक लावून शासनासह बँकेची फसवणुक केल्याप्रकरणी मोहम्मद मोबीन मिल्लत खान या आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. गेल्या एक वर्षांपासून तो फरार होता. अखेर त्याला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीनंतर आरोपीला लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यांत अथर्व कॉलेजमध्ये एकाच क्रमांक असलेले दोन ट्रक उभे होते. हा प्रकार एका दक्ष नागरिकांच्या निदर्शनास येताच त्याने कांदिवली वाहतूक पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे धाव घेतली होती. यावेळी तिथे पोलिसांना एकाच नंबर क्रमांकाचे दोन ट्रक उभे असल्याचे दिसून आले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सलीम मोबीन खान याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे दोन्ही ट्रकच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने कागदपत्रे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला ट्रकचे कागदपत्रे सादर करण्याचे समन्स देण्यात आले होते. तपासात त्यातील एक ट्रक मोहम्मद मोबीन याच्या मालकीचा होता. तो कांदिवलीतील मार्वे लिंक रोड, गणेशनगर सोसायटीमध्ये राहत होता. दुसरा ट्रक विनोद जगन यादवचा होता. तो नालासोपारा येथील धनीव रोड, गांगडेपाडा हाऊसचा रहिवाशी होता. या दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलीस गेल्यानंतर ते दोघेही त्यांच्या बिहार येथील पटना गावी निघून गेल्याचे पोलिसांना समजले होते. यातील विनोद यादवने ट्रक विकत घेताना एका खाजगी बँकेतून चौदा लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र कर्जाचे हप्ते भरता येत नसल्याने त्याने बँकेला न कळविता या ट्रकची परस्पर मोहम्मद मोबीनला विक्री केली होती. तसेच त्याला कर्जाचे हप्ते भरण्याची विनंती केली होती. विनोदने बँकेत हप्ते भरले नसल्याने कुठल्याही क्षणी बँकेकडून ट्रकवर जप्ती होण्याची शक्यता होती. जप्तीची कारवाई होऊ नये म्हणून मोहम्मद मोबीनने स्वतच्या ट्रकचा क्रमांकासह चेसीस आणि इंजिन क्रमांक बदलून हा ट्रक स्वतचा वापरण्यासाठी ठेवला होता. अशा प्रकारे त्याने शासनासह बँकेची फसवणुक केली होती. त्यामुळे ऑगस्ट २०२२ रोजी पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी पळून गेले होते. गेल्या एक वर्षांपासून आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु होता. अखेर यातील मोहम्मद मोबीन खानला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी संागितले.