पायलटच्या नोकरीसाठी अठरा लाखांचा गंडा घालणार्‍या आरोपीस अटक

पायलटच्या नोकरीसाठी त्यांच्याकडे अठरा लाखांची मागणी केली होती
पायलटच्या नोकरीसाठी अठरा लाखांचा गंडा घालणार्‍या आरोपीस अटक

मुंबई : पायलटच्या नोकरीसाठी एका वयोवृद्धाला सुमारे अठरा लाखांना गंडा घालणार्‍या हेन्री पॉल डिकोडोट नावाच्या एका मुख्य आरोपीस विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत भावना टी नावाची एक महिला सहआरोपी असून तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. विलेपार्ले येथे ६३ वर्षांचे वयोवृद्ध त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांच्या ३६ वर्षांच्या अमेरिकेत कमर्शियल पायलटचा कोर्स पूर्ण केला होता. तीन महिन्यांचा टाईप राईटिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याला कुठल्याही नामांकित एअरलाईन्स कंपनीत नोकरी मिळणार होती. या कोर्ससाठी त्यांची चौकशी सुरु होती. याच दरम्यान जुलै २०१७ रोजी त्यांची हेन्री आणि भावना यांच्याशी ओळख झाली होती. या दोघांनी तक्रारदारांना त्यांच्या मुलासह पायलटची नोकरी मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी त्यांचे कमिशन तीन लाख रुपये तर कोर्ससह पायलटच्या नोकरीसाठी त्यांच्याकडे अठरा लाखांची मागणी केली होती. मुलाच्या भविष्याचा प्रश्‍न असल्याने त्यांनी त्यास होकार दिला. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना टप्याटप्याने अठरा लाख रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र ही रक्कम देऊनही त्याने त्याचा कोर्स सुरु केला नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांना विविध कारण सांगून टाळत होते. जून २०१९ रोजी ते त्यांच्या विलेपार्ले येथील कार्यालयात गेले, यावेळी त्यांना हेन्रीचे कार्यालय बंद असलयाचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. अशा प्रकारे जुलै २०१७ ते जुलै २०२३ या कालावधीत हेन्री आणि भावना यांनी त्यांच्या मुलाला कोर्स पूर्ण करुन नामांकित एअरलाईन्स कंपनीत नोकरीचे आश्‍वासन देऊन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी विलेपार्ले पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर १४ जुलै २०२३ रोजी पोलिसांनी हेन्रीसह भावनाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या हेन्रीला पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे तर भावनाचा पोलीस शोध घेत आहेत. या दोघांनी अशाच प्रकारे किती लोकांची फसवणुक केली आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in