मुंबई : हत्येच्या गुन्ह्यांत जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर पुण्यातील येरवडा कारागृहात असताना पॅरोलवर बाहेर आल्यानंतर पळून गेलेल्या एका आरोपीस तीन वर्षांनी अटक करण्यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. जुबेर बशीर अहमद इद्रीसी असे या ३६ वर्षीय आरोपीचे नाव असून, मुंबईतून पळून गेल्यानंतर तो उत्तरप्रदेशातील मिर्झापूर शहरात वास्तव्यास होता, तेथूनच त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर यांनी सांगितले. २०११ साली एमआयडीसी पोलिसांनी हत्या, हत्येचा प्रयत्नासह अन्य भादवी कलमांतर्गत एका गुन्ह्यांची नोंद केली होती. याच गुन्ह्यांत जुबेर इद्रीसी याच्यासह इतर काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या खटल्यांत जुबेरला अतिरिक्त सेशन कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिक्षा झाल्यानंतर त्याला पुण्याच्या येरवडा कारागृहात पाठविण्यात आले होते. २० जून ते ४ ऑगस्ट २०२० या कालावधीत जुबेरला पॅरोलवर सोडण्यात आले होते. पॅरोलची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात येणे दाखल होणे आवश्यक होते; मात्र पॅरोलवर सुटताच तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता.