
मुंबई : एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी आलेल्या एका वयोवृद्धाची कॅश चोरी करुन पळून गेलेल्या आरोपीस व्ही. पी रोड पोलिसांनी अटक केली. बिरलाल लक्ष्मण साहू असे या आरोपीचे नाव असून, तो मूळचा बिहारचा रहिवाशी आहे. बिरलाल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. जून महिन्यांत विलास सदाशिव पिंपळे (८२) हे एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी कॅश भिंतीला लावलेल्या स्टॅण्डवर ठेवून स्लिप भरत होते. याच दरम्यान तिथे एक तरुण आला आणि काही वेळानंतर निघून गेला. यावेळी त्यांना १८ हजार ५०० रुपयांची कॅश चोरी झाल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी व्ही. पी रोड पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या बिरलाल साहूला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले.