मुंबई : पत्नीवर ॲॅसिड हल्ला करणाऱ्या इशरत शेख या आरोपी पतीला निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीसह मुलावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी कौटुंबिक वादातून घडलेल्या या प्रकाराने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. वांद्रे येथे राहणाऱ्या तक्रारदार महिलेला १२ वर्षांचा मुलगा आहे. तिचा पती इशरत हा चालक म्हणून नोकरी करतो. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होता. सतत होणाऱ्या वादानंतर तिने पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेताना त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली होती. मात्र त्याला तिला घटस्फोट द्यायचा नव्हता. याच कारणावरून सोमवारी त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. या वादानंतर त्याने तिच्यावर ॲॅसिड हल्ला केला. त्यात तिच्या पाठीला, हाताला आणि पोटाला तर तिच्या मुलाच्या
पाठीला दुखापत झाली होती. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी या दोघांनाही कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी आरोपी पती इशरत शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या पतीला काही तासांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.