एटीएस अधिकारीची निर्दोष सुटका; मुंबई हायकोर्टाचा निकाल

एटीएसच्या पथकाने २६ आणि २७ डिसेंबर २००९च्या मध्यरात्री मुलुंड येथील एका क्लबवर छापा टाकला होता.
एटीएस अधिकारीची निर्दोष सुटका; मुंबई हायकोर्टाचा निकाल

माजी एटीएस अधिकारी अरुण खानविलकर यांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुंबई हायकोर्टाने १२ वर्षांनंतर निर्दोष सुटका केली. खानविलकर हे राज्य दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) कार्यरत होते. २०१० मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक होण्यापूर्वी ते मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण, औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण, २००६ सालच्या उपनगरीय रेल्वेतील साखळी बॉम्बस्फोटांसारख्या संवेदनशील प्रकरणांचा तपास करणाऱ्या पथकाचा भाग होते.

खानविलकर आणि इतर दोघांविरुद्ध पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, एटीएसच्या पथकाने २६ आणि २७ डिसेंबर २००९च्या मध्यरात्री मुलुंड येथील एका क्लबवर छापा टाकला होता. त्यावेळी पोलिसांच्या पथकाने लॉटरी व्यवसाय करणाऱ्या फिर्यादीसह काही लोकांना पकडले. आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोप करून त्याला सोडण्यासाठी पोलिसांनी २० लाख रुपयांची मागणी केली, असा आरोप तक्रारदाराने केला होता. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी मंजुरी दिल्यावर खानविलकर यांच्यावर खटला चालवण्यात आला. ऑक्टोबर २०१३ मध्ये विशेष न्यायालयाने खानविलकर यांना त्यांच्यावरील आरोपांत दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, या निर्णयाला खानविलकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. खानविलकर यांनी लाच मागितल्याचे पुरावे संपूर्ण खटल्यादरम्यान पुढे आलेले नाही. खानविलकर यांनी लाच घेतल्याचे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्याचे नमूद करून न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने खानविलकर यांची भ्रष्टाचाराच्या आरोपांतून निर्दोष सुटका केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in