

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’ कार्यालयाबाहेर आयोजित केलेली सभा उधळून घोळ घातल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने १९ वर्षांनंतर अखेर शिवसेना नेते आमदार अनिल परब, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, बाळा नांदगावकर, बाळा नर यांच्यासह ३८ शिवसैनिकांची सबळ पुराव्यांअभावी शनिवारी निर्दोष मुक्तता केली.
सत्र न्यायाधीश आदिती कदम यांनी घटना घडून १९ वर्षे उलटल्यानंतर हा निकाल देत शिवसैनिकांना दिलासा दिला आहे.
१९ वर्षांपूर्वी मतभेदामुळे नारायण राणे यानी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’ कार्यालयाबाहेर जाहीर सभा आयोजित केली होती. राणे यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ या सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेना नेत्यांसह शिवसैनिक हजर होते. शिवसैनिकांनी राणेंच्या सभेत गोंधळ घालण्याचा आणि ती सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. त्यात अनेकजण गंभीररीत्या जखमी झाले होते. तेव्हा शिवसेनेत असलेले सध्या शिंदे गटाचे सदा सरवणकर, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यासह ४७ जणांविरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गेल्या वर्षी जून २३ ला न्यायालयाने आरोपींविरोधात भादंवि कलम १४१, १४३, १४५, १४७, १४९, ३१९, ३५३ यासह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ नुसार आरोप निश्चित केले. सर्व आरोपींनी एकसुरात सर्व आरोपांचा इन्कार केला होता.
खटल्याची शनिवारी सत्रन्यायाधीश आदिती कदम यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने ३८ शिवसैनिकांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.
खटल्यात आरोपी म्हणून शिवसेनेच्या विद्यमान ३ खासदार आणि ४ आमदारांसह ४७ आजी - माजी आमदार - खासदार, नगरसेवक आणि शिवसैनिकांविरोधात दादर पोलीस ठाण्यात ५ गुन्हे दाखल.
पाच आरोपींचे १९ वर्षांत निधन झाले आहे, तर तीन आरोपींबाबत कोणतीच माहीत उपलब्ध नसल्याची बाब न्यायालयात उघड झाली आहे.
आरोपींमध्ये शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गटाच्या पाच आरोपीचे १९ वर्षांत निधन, तर तीन आरोपी कोण हे कोणालाच माहीत नसल्याची बाब न्यायालयात उघडकीस आले.
आरोपींमध्ये शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांचा समावेश आहे.