११ महिन्यांत ३७ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई; सवा कोटींचा दंड वसूल

विनातिकीट प्रवाशांच्या मुसक्या आवळल्या
११ महिन्यांत ३७ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई; सवा कोटींचा दंड वसूल

मुंबई : विनातिकीट, अंतरापेक्षा अधिक प्रवास, एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात मध्य रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेअंतर्गत जानेवारी नोव्हेंबर २०२३पर्यंत तब्बल ३६ हजार ९७८ फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत १ कोटी २४ लाखांचा महसूल जमा झाला आहे. दरम्यान, २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये ३४.९० टक्के महसुलात वाढ झाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या मध्य रेल्वेने विना तिकीट अंतरापेक्षा अधिक प्रवास, एसी लोकलने साध्या तिकीटावर प्रवास करणाऱ्या विरोधात मध्य रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. नोव्हेंबर-२०२३ या महिन्यात विनातिकीट, अनियमित प्रवासासाठी आणि बुक न केलेल्या सामानासाठी एकूण २.०७ लाख प्रवासी विनातिकीट आढळून आले, मागील वर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये हे प्रमाण १.८० लाख प्रवाशी इतके होते, त्या तुलनेत नोव्हेंबर २०२३ मध्ये १४.८५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

एका महिन्यात १३.७० कोटी दंड वसूल

नोव्हेंबर २०२३ मध्ये अशा विनातिकीट प्रवाशांकडून १३.७० कोटी दंड ठोठावण्यात आलेला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ३४.९० टक्क्यांनी अधिक आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये १०.१५ कोटी रूपये दंड आकारण्यात आला होता. तर एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या चालू आर्थिक वर्षात, १४.१९ लाख विनातिकीट प्रवासी आढळून आले आणि त्यांच्याकडून ₹८१.७३ कोटी इतका दंड आकारण्यात आला. यात गेल्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ च्या तुलनेत विनातिकीट प्रवाशांमध्ये चालू वर्षात ५.२७% वाढ आणि दंड म्हणून आकारण्यात आलेल्या दंडात ६.०९% वाढ झाली आहे. या कालावधीत १३.४८ लाख विनातिकीट/अनियमित प्रवाशांकडून ₹ ७७.०४ कोटी दंड म्हणून वसूल करण्यात आले.

वातानुकूलित लोकल ट्रेनमध्ये विनातिकीट प्रवासी

मुंबई उपनगरीय मार्गावरील वातानुकूलित लोकल ट्रेनमध्ये केवळ नियमित वैध तिकीट धारक प्रवाशांची खात्री करून, नोव्हेंबर २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात तिकीट केलेल्या तपासणीद्वारे २४०३ विनातिकीट प्रवासी सापडले आणि त्यांना ₹७.९७ लाख दंड ठोठावण्यात आला. या चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान, एकूण ३६९७८ व्यक्ती विनातिकीट/अनियमित तिकीट वातानुकूलित लोकल मधून प्रवास करताना आढळून आले व त्यांच्याकडून एकूण १.२४ कोटीचा दंड आकारण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in