मुंबई विभागातील १००हून अधिक कर्मचारी एसटी चालकांवर कारवाई

एसटी बसेस रस्त्यावर धावत असताना चक्क नियम धुडकावून लावत असल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबई विभागातील १००हून अधिक कर्मचारी एसटी चालकांवर कारवाई

राज्यात ठिकठिकाणी एसटी वाहतूक पूर्वपदावर आली आहे. मात्र या एसटी बसेस रस्त्यावर धावत असताना चक्क नियम धुडकावून लावत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये उड्डाणपुलाजवळील किंवा त्याखालील बस थांबे टाळून थेट उड्डाणपुलावरून एसटी नेण्याचे प्रकार मुंबई महानगरात दिवसाआड घडत असून याबाबत मागील काही दिवसांपासून विविध ठिकाणाहून तक्रारी प्राप्त झाल्यावर विशेष पथकामार्फत तपासणी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला.

यामध्ये आतापर्यंत १००हून अधिक कर्मचारी दोषी आढळल्याचे एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून नाव न सांगण्याच्या अटींवरून सांगण्यात आले आहे. यामध्ये रायगड, ठाणे आणि मुंबई विभागातील कर्मचारी चालकांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली असून अशा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच काही चालकांची वेतनवाढही रोखण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.

संपानंतर सुरू झालेल्या एसटी बसेस महामंडळाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे. महामंडळाचे आदेश धुडकावून मुंबईत कुर्ला नेहरू नगर, मुंबई सेंट्रल, परळ आगार, नॅन्सी कॉलनी, ठाण्यातील वंदना, खोपट, ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील आगार, तसेच महानगरातील अन्य आगारांतून निघणाऱ्या बसेस उड्डाणपुलाजवळच किंवा त्याखाली असलेल्या नियोजित बस थांब्यांवर न थांबता उड्डाणपुलावरून थेट पुढे निघून जात असल्याचे निदर्शास आले आहे. एसटी न थांबताच काही चालक, वाहक थेट उड्डाणपुलावरूनच बस घेऊन जात असल्याने थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना तासनतास बसची प्रतीक्षा करावी लागते. दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून थांब्यांवर न थांबता थेट उड्डाणपुलावरून चालक एसटी घेऊन रवाना झाल्याच्या तक्रारी महामंडळाकडे आल्या आहेत. याची दखल महामंडळाकडून घेण्यात आली असून आतापर्यंत १०० हून अधिक चालक या प्रकरणी दोषी आढळून आले आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून निम्म्याहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in