मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कारवाई; मुंबई महापालिकेकडून ३,६०५ धारकांवर जप्ती, १,६७२ कोटी रुपयांची थकबाकी पैकी २१८ कोटी ९६ लाख वसूल

बई महापालिकेने सातत्याने आवाहन करून आणि पाठपुरावा करूनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ३ हजार ६०५ मालमत्ताधारकांवर पालिकेने कारवाई केली आहे. पालिकेच्या वतीने आर्थिक वर्षात म्‍हणजेच १ एप्रिल २०२४ पासून जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे.
मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कारवाई; मुंबई महापालिकेकडून ३,६०५ धारकांवर जप्ती, १,६७२ कोटी रुपयांची थकबाकी पैकी २१८ कोटी ९६ लाख वसूल
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेने सातत्याने आवाहन करून आणि पाठपुरावा करूनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ३ हजार ६०५ मालमत्ताधारकांवर पालिकेने कारवाई केली आहे. पालिकेच्या वतीने आर्थिक वर्षात म्‍हणजेच १ एप्रिल २०२४ पासून जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे.

या मालमत्तांमध्ये भूखंड आणि निवासी-व्‍यावसायिक इमारती, व्‍यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे आदींचा समावेश आहे. यामध्ये पश्चिम उपनगरात सर्वाधिक १ हजार ७६७, शहर विभागात १ हजार २३२ तर पूर्व उपनगरातील ६०६ मालमत्तांवर जप्‍ती आणि अटकावणीची कारवाई करण्‍यात आली आहे. या ३ हजार ६०५ मालमत्ताधारकांकडे एकूण १ हजार ६७२ कोटी ४१ लाख रुपयांची कर थकबाकी आहे. त्‍यापैकी २१८ कोटी ९६ लाख रुपयांचा कर भरणा या मालमत्ताधारकांनी केला आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी करनिर्धारण व संकलन खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे.तथापि, कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

कर निर्धारण व संकलन विभागाने २०२४ - २५ आर्थिक वर्षात ६ हजार २०० कोटी रुपये कर संकलन उद्दिष्‍ट निश्चित केले आहे. त्‍या दृष्‍टीने विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू आहे. निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना महानगरपालिकेकडून कलम २०३ अन्वये जप्‍तीची नोटीस बजावण्यात येत आहे.

विहीत मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित मालमत्तेवर कलम २०३, २०४, २०५, २०६ अन्वये मालमत्तेतील वस्तू जप्त करून लिलाव केला जाणार आहे. मालमत्तेचा उच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक २५९२/२०१३ च्या अंतरिम आदेशान्वये येणारा कर वसूल न झाल्यास मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असे नोटिशीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील ‘टॉप टेन’ मालमत्ताधारक

१) मेसर्स सेजल शक्‍ती रिॲल्‍टर्स (एफ उत्‍तर विभाग) - १४ कोटी ८५ लाख ९९ हजार २०८ रुपये

२) लक्ष्‍मी कमर्शियल प्रीमायसेस (जी उत्तर विभाग) - १४ कोटी २९ लाख

९० हजार १२१ रुपये

३) मेसर्स एशियन हॉटेल्‍स लिमिटेड (के पूर्व विभाग) - १४ कोटी १८ लाख

९२ हजार ३०२ रुपये

४) सहारा हॉटेल्‍स (के पूर्व विभाग) - १३ कोटी ९३ लाख

५० हजार ९६३ रुपये

५) मेसर्स न्यूमॅक ॲण्‍ड रिओडर जे. व्ही. (एफ उत्तर विभाग) - १३ कोटी

४५ लाख ४४ हजार ८१२ रुपये

६) मेसर्स फोरमोस्‍ट रिॲल्‍टर्स प्रायव्‍हेट लिमिटेड (एच पूर्व विभाग) - १२ कोटी ५० लाख ९० हजार १३९ रुपये

७) श्री साई पवन को - ऑपरेटीव्‍ह हाऊसिंग सोसायटी (के पश्चिम विभाग) - ११ कोटी ६९ लाख ४५ हजार ०५८ रुपये

८) कमला मिल्‍स लिमिटेड (जी दक्षिण विभाग) ११ कोटी ४७ लाख २५ हजार १३० रुपये

९) श्री एल. एन. गडोदिया ॲण्‍ड सन्‍स लिमिटेड (एच पश्चिम विभाग) - ११ कोटी ४४ लाख ९७ हजार ५८२ रुपये

१०) मोहित कन्‍स्‍ट्रक्‍शन (के पश्चिम विभाग) ११ कोटी २६ लाख ५६ हजार २६७ रुपये

logo
marathi.freepressjournal.in