अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्सबाजी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम तीव्र

जानेवारी ते जून २०२२पर्यंत १० हजार ६५३ अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्स काढण्यात आले आहेत
अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्सबाजी करणाऱ्यांविरुद्ध  कारवाईची मोहीम तीव्र

मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्सबाजी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. तब्बल ६४१ जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात आली असून, १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ४३७ प्रकरणांत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, जानेवारी ते जून २०२२पर्यंत १० हजार ६५३ अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्स काढण्यात आले आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईत अवैध होर्डिंग्ज लावण्यावर निर्बंध आहेत; मात्र तरीही मुंबईतील रस्ते, नाके, उड्डाणपूल अशा जागोजागी होर्डिंग्ज लावण्यात येत आहेत. यामुळे अनेक मोकळ्या जागा व्यापल्या जात आहेत. राजकीय पुढाऱ्यांचे वाढदिवस, सभा, मोर्चे, तसेच विविध कार्यक्रमांच्या जाहिरातींमुळे अवैध होर्डिंग्जची संख्या वाढते आहे. यातील बहुतांश होर्डिंग्ज अवैध आहेत. तशा तक्रारीही पालिकेकडे नोंद होत आहेत. तक्रारीनंतर पालिकेकडून होर्डिंग्ज काढले जातात; मात्र त्यानंतरही पुन्हा त्याच जागेवर होर्डिंग्ज लावले जात असल्याचे समोर आले आहे, अशा होर्डिंग्जमुळे मुंबई विद्रूप होत असल्याने पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या जानेवारी ते जून २०२२पर्यंत एकूण १० हजारांहून अधिक होर्डिंग्ज, बॅनर पोस्टर्सवर कारवाई करण्यात आली आहे; मात्र राजकीय बॅनरबाजीपेक्षा धार्मिक बॅनरबाजी मुंबईत वाढू लागली आहे. पालिकेने गेल्या सहा महिन्यांत तब्बल सहा हजार ३०८ धार्मिक जाहिरातींवर कारवाई केली, तर तीन हजार ५२३ राजकीय होर्डिंग्ज, बॅनर काढून टाकले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in