खासगी प्रयोगशाळेत रक्त नमुने पाठवल्यास कारवाई ; सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या अधीक्षकांचा इशारा

सर्व विभागप्रमुख आणि निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी लॅबमध्ये रक्त तपासणी करू नये, अशी सक्त ताकीद दिली
खासगी प्रयोगशाळेत रक्त नमुने पाठवल्यास कारवाई ; सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या अधीक्षकांचा इशारा

सेंट जॉर्ज रुग्णालयात रक्त तपासणीची सुविधा असतानाही डॉक्टर खासगी प्रयोगशाळेत रुग्णांच्या रक्त तपासणी करून घेत आहेत. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर रुग्णालयाच्या अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष घातले आहे. या प्रकरणी अधीक्षकांनी नोटीस बजावून सर्व विभागप्रमुख आणि निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी लॅबमध्ये रक्त तपासणी करू नये, अशी सक्त ताकीद दिली आहे.

या इशाऱ्याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. मुंबई शहरातील सर्वात जुन्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त तपासणीची सुविधा आहे. असे असतानाही येथे दाखल असलेल्या रुग्णांची रक्त तपासणी खासगी लॅबमध्ये केली जाते. खासगी लॅबही या रुग्णांकडून हवे ते पैसे घेतात. त्यामुळे या गरीब रुग्णांच्या खिशावर आर्थिक भार वाढत होता.

रुग्णालयातील खासगी पॅथॉलॉजी लॅबचे रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळताच अधीक्षक डॉ.विनायक सावर्डेकर यांनी तात्काळ कारवाई केली. हा घोटाळा रोखण्यासाठी त्यांनी सोमवारी नोटीस बजावली आहे. खासगी लॅबमधून रक्त तपासणी करून घेऊ नये, अशा सक्त सूचना त्यांनी या नोटिशीच्या माध्यमातून सर्व विभागप्रमुखांना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

डॉ. विनायक यांनी नोटीस जारी केल्याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, कोणत्याही चाचणीची नितांत आवश्यकता असल्यास ती खासगी लॅबमधून करून घेण्यापूर्वी डॉक्टरांनी रुग्णाच्या कुटुंबीयांची आणि निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याची संमती घेणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in