मुंबई : आरोग्य सुविधा उपलब्ध असताना ओळखीच्या रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात विनाकारण दाखल करणे आता महागात पडणार आहे. दुसऱ्या रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्याची खरंच गरज होती का यासाठी पडताळणी समिती स्थापन करा, असे आदेश सार्वजनिक आरोग्य कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून वातावरणीय बदलामुळे पाऊसही लहरी झाला आहे. या वर्षी जून महिना कोरडा गेला, तर जुलै महिन्यांत पावसाने मुंबईसह राज्यातील अनेक भागांना झोडपून काढले. काही भागात तर पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याठिकाणी रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. पूरस्थिती निर्माण झालेल्या भागात रोगराई पसरू नये आणि बाधित रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे, यासाठी साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्क रहावे. शहरात, गावांमध्ये स्वच्छतेसह डास निर्मूलन मोहीम राबवावी. पुरासारख्या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विभागाने तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.
पावसाळ्याच्या काळात आरोग्य यंत्रणेने अलर्ट मोडवर काम करण्याच्या सूचना करीत आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले, स्वछता राखणे व डास निर्मूलनासाठी शहरांमध्ये नगर विकास विभागाचे मनुष्यबळ या कार्यवाहीसाठी उपयोगात आणावे. तसेच ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकास व महसूल विभागाच्या मदतीने ही मोहिम राबवावी, असे ही ते म्हणाले.
दररोज साथ रोग स्थितीचा आढावा घ्या!
जिल्ह्यातील डॉक्टर्स, संबंधित यंत्रणेशी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दररोज किमान एक तास दूरदृ्श्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधून साथरोगाबाबतची परिस्थिती जाणून घ्यावी. आरोग्यसेवेसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाची मदत घेण्यात यावी, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.
औषधाअभावी रुग्णांची गैरसोय होऊ नये!
औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यात यावा. औषध खरेदीसाठी विलंब टाळण्यासाठी १०० टक्के औषधे जिल्हा नियोजन निधीमधून खरेदी करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात यावे. औषधांअभावी रुग्णांची गैरसोय होता कामा नये, यावर लक्ष द्यावे.