मालाडच्या मूड डान्सबारवर कारवाई ३० जणांना अटक तर २५ बारबालांची सुटका

मालाडच्या मूड डान्सबारवर कारवाई 
३० जणांना अटक तर २५ बारबालांची सुटका

मालाडच्या मूड बारवर शनिवारी रात्री उशिरा समाजसेवा शाखा आणि मालाड पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी बारचा मॅनेजर, कॅशिअरसह तीसजणांना अटक केली तर पंचवीसहून अधिक बारबालांची सुटका केली. अटकेनंतर या सर्वांना मालाड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते.

मूड बार ऍण्ड रेस्टॉरंट व बारमध्ये रात्री उशिरापर्यंत बारबालांना कामावर ठेवून बारमधील मॅनेजरसह इतर कर्मचारी त्यांना ग्राहकांसोबत अश्‍लील वर्तन करण्यास प्रवृत्त करीत असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकाऱ्यांनी मालाड पोलिसांच्या मदतीने तिथे रात्री उशिरा छापा टाकला होता. यावेळी तिथे काही ग्राहक बारबालांशी अश्‍लील वर्तन करताना दिसून आले. त्यामुळे या बारबालांची सुटका करुन त्यांची नावे आणि इतर माहिती घेऊन सोडून देण्यात आले तर बारमध्ये उपस्थित तीसजणांना पोलिसांनी अटक केली. त्यात बारचा मॅनेजर, कॅशिअर, वेटरसह ग्राहकांचा समावेश आहे. या सर्वांना मालाड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृह आणि मद्यपान कक्ष यामधील अश्‍लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत आणि महिलांचे प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in