मराठी पाट्यांच्या कचाट्यात प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई लटकली

प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर लवकरच पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मराठी पाट्यांच्या कचाट्यात प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई लटकली

मुंबई : प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईला वेग आला असताना मराठी पाट्या न लावणाऱ्या विरोधात पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागातील अधिकाऱ्यांना जुंपण्यात आले आहे. दुकाने व आस्थापना विभागातील अधिकारी मराठी पाट्याच्या कारवाईत गुंतल्याने प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई लटकली आहे. दरम्यान, मराठी पाट्या न लावणाऱ्या विरोधात कारवाई सुरू असून, प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर लवकरच पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रतिबंधित ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर आता तीव्र कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी २१ ऑगस्टपासून पालिकेच्या दिमतीला आले.

एमपीसीबीचे अधिकारी पालिकेचे अधिकारी व एक पोलीस अशा पाच जणांच्या टीमने धडक कारवाईला सुरुवात केली. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईला वेग आला असताना मुंबईत प्रदूषणाने डोके वर काढले आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी माघारी गेले आणि प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई थंडावली. पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागामार्फत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर हळुवार कारवाई सुरू ठेवली. परंतु दुकाने व आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या न लावणाऱ्या विरोधात मंगळवार २७ नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. मराठी पाट्या न लावणाऱ्या विरोधात पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागातील अधिकारी पुन्हा गुंतले गेले. त्यामुळे प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई लटकली आहे.

२६ जुलै २००५ मध्ये मुंबईत आलेल्या महापुरास प्लास्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्याने राज्य सरकारने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यावर बंदी घातली.

१ जुलै २०२२ ते २० नोव्हेंबर २०२३ पर्यंतची आकडेवारी

२,७४९ दुकाने व फेरीवाल्यांची झाडाझडती

प्लास्टिक पिशव्या जप्त - ७,५५० किलो

दंड वसूल - १ कोटी ३७ लाख ७५ हजार

न्यायालयात खेचले - ४३ जणांना

या प्लास्टिक पिशव्यांसह अन्य वस्तूंवर बंदी

प्लास्टिक डिश, बाउल, कॅन्टेनर (डबे), प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या (स्टिरर्स) इत्यादी, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंग साठी वापरले जाणारे प्लास्टिक भांडे व वाटी (कंटेनर व बाउल) प्लास्टिक लेपित तसेच प्लास्टिक थर असणाऱ्या पेपर/ऍल्यूमिनियम इत्यादीपासून बनविलेल्या डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटे, वाडगा, कंटेनर इत्यादी.

यावरही बंदी!

  • सजावटीसाठी प्लास्टिक व थर्माकॉल

  • मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकिटे यांची प्लास्टिकची आवरणे

  • प्लास्टिकच्या काड्यांसह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे झेंडे, कँडी कांड्या

  • आईस्क्रीम कांड्या, प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर (१०० मायक्रॉन पेक्षा कमी)

logo
marathi.freepressjournal.in