क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांविरुद्ध कारवाई व्हावी - चंद्रकांत हंडोरे

हंडोरे यांनी भीमशक्ती या संघटनेची राज्यव्यापी चिंतन बैठक रविवारी चेंबूरमध्ये आयोजित केली होती
क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांविरुद्ध कारवाई व्हावी - चंद्रकांत हंडोरे

विधान परिषदेच्या निवडणुकीतील पराभवामुळे व्यथित झालेले काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांनी क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसमधील काही आमदारांविरुद्ध राहुल गांधींकडे तक्रार केली आहे. त्यांच्यावर येत्या काही दिवसांत कारवाई होईल, असे अपेक्षित आहे.

हंडोरे यांनी भीमशक्ती या संघटनेची राज्यव्यापी चिंतन बैठक रविवारी चेंबूरमध्ये आयोजित केली होती. या बैठकीला संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर हे नाराज असलेले हंडोरे शिंदे गटात सहभागी होतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

यावेळी चंद्रकांत हंडोरे म्हणाले, “काँग्रेसने मला दोन वेळा आमदार बनवले. मंत्री बनवलं आहे. मागील निवडणुकीत विधान परिषदेचे तिकीटही दिले होते. मात्र, काँग्रेसमधील काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले, त्यामुळे त्या निवडणुकीत मला पराभवाला सामोरे जावे लागले. हार-जीत ही निवडणुकीत होतच असते; पण माझ्याविरोधात स्वपक्षीयांनीच मतदान केले. ज्यांनी विरोधात मतं दिली, त्यांच्याविरोधात राहुल गांधींकडे तक्रार केलेली आहे. पक्षनेतृत्वानेही त्याची दखल घेत तत्काळ निरीक्षक पाठवून माहिती घेतली आहे. पक्षाच्या विरोधात ज्या आमदाराने काम केले आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे,” असेही हंडोरे यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in