मुंबई-पुणे महामार्गावर १३ दिवसांत नियम मोडणाऱ्या १,६६० वाहनचालकांवर कारवाई

सुरक्षा मोहिमेदरम्यान १ ते १३ डिसेंबर कालावधीत सुमारे १,६६० वाहनधारकांना दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर १,२९९ उल्लंघने झाली
मुंबई-पुणे महामार्गावर १३ दिवसांत नियम मोडणाऱ्या १,६६० वाहनचालकांवर कारवाई

प्रादेशिक परिवहन विभागाकडून १ डिसेंबरपासून मुंबई पुणे महामार्गावर अपघात टाळण्यासाठी 'सुरक्षा जनजागृती' मोहिम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत त्यांचे समुपदेशन देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे. या मोहिमेवेळी लेन कटिंगची सर्वाधिक प्रकरणे उघडकीस आली असून ४५ टक्के या प्रकरणांची नोंद झाल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे. यासोबत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सीटबेल्ट न लावता वाहन चालवणे, अति वेग अशा विविध कारणांनी सुरक्षा मोहिमेदरम्यान १ ते १३ डिसेंबर कालावधीत सुमारे १,६६० वाहनधारकांना दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर १,२९९ उल्लंघने झाली आहेत आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर किंवा एनएच ४८ वर गेल्या १३ दिवसांत ३६१ उल्लंघनांची नोंद झाली आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रथमच १ डिसेंबरपासून सुरक्षा मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेसाठी आरटीओने दोन्ही महामार्गांवर एकत्रितपणे १२ पथके तैनात केलीय आहेत. प्रत्येक पथकामध्ये १५ अधिकारी आहेत. मोहिमेवेळी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत त्याचठिकाणी त्यांचे समुपदेशन करत वाहनचालकांना रस्त्याच्या शिस्तीचे पालन करण्याच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी घेण्यात येत आहे. वेगात चालणे, लेन कटिंग, सीटबेल्ट न लावता वाहन चालवणे आणि चुकीच्या बाजूने पार्किंग अशा अनेक गोष्टी बारकाईने पथकाकडून तपासल्या जात आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवड पथकाने वेग मर्यादा ओलांडल्याबद्दल तसेच सीटबेल्ट न लावणाऱ्या ७११ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. तसेच पुणे पथकाने लेन कटिंग करणाऱ्या २४८ जणांवर दंड ठोठावला आणि त्यांचे समुपदेशन केले आहे. दरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावरील सर्व प्रवाशांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करावे आणि सध्या सुरू असलेल्या सुरक्षा मोहिमेला सहकार्य करावे असे प्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

आम्ही उल्लंघन करणार्‍यांना रस्ता सुरक्षेविषयी माहिती देतो आणि त्यांना रस्ता सुरक्षा जागरूकता चित्रपट दाखवतो. उल्लंघन करणाऱ्यांनी नियमांचे पालन करण्याची शपथ घेतल्यानंतर त्यांना समुपदेशन पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र दिले जाते. खालापूर आणि उर्से टोल नाक्यावर समुपदेशन केले जात आहे. वेगात चालणे, लेन कटिंग, सीटबेल्ट न लावता वाहन चालवणे आणि चुकीच्या बाजूने पार्किंग अशा अनेक गोष्टी तपासल्या जात आहेत.

- भरत काळसकर, उपायुक्त, रस्ते सुरक्षा विभाग, वाहतूक

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in