प्लास्टिक बंदीची कारवाई प्रदूषणात विरली; एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांची कारवाईतून माघार

५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागामार्फत कारवाई करण्यात येते
प्लास्टिक बंदीची कारवाई प्रदूषणात विरली;
एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांची कारवाईतून माघार

मुंबई :पर्यावरणास हानीकारक व प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईला वेग आला असताना पालिकेच्या दिमतीला आलेले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पुन्हा माघारी गेले. त्यामुळे प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई प्रदूषणात विरली आहे.

५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागामार्फत कारवाई करण्यात येते. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर कारवाईला वेग देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या दिमतीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे २४ अधिकारी दाखल झाले. एमपीबीचे २४ अधिकारी, पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाचे तीन अधिकारी व एक पोलीस पाच जणांच्या टीमच्या माध्यमातून प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर २१ ऑगस्टपासून कारवाईला सुरुवात झाली. २१ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर या अडीच महिन्यांत तब्बल २,१५९ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर जप्तीच्या कारवाईतून ५४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

२६ जुलै २००५ मध्ये मुंबईत आलेल्या महापुरास प्लास्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्याने राज्य सरकारने २०१८ मध्ये ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर बंदी घातली. राज्य सरकारच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने कारवाईला सुरुवात केली. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर कारवाईला वेग आला असताना मुंबईत २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवरील कारवाई थंडावली; मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा एकदा १ जुलै २०२२ पासून प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली.

प्रतिक्रिया

एमपीसीबीचे अधिकारी, पालिकेचे अधिकारी व पोलीस या टीमच्या माध्यमातून होणाऱ्या कारवाईला वेग आला असताना मुंबईला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. वाढत्या प्रदूषणाचा धोका लक्षात घेता एमपीसीबीचे अधिकारी पुन्हा माघारी गेल्याने प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवरील कारवाई पुन्हा एकदा थंडावली आहे. मात्र पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागामार्फत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

-संजोग कबरे, पालिकेचे विशेष उपायुक्त

अडीच महिन्यांत अशी झाली कारवाई

पाच जणांचे पथक

२१ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर - २,१५९ किलो प्लास्टिक जप्त

अडीच महिन्यांत - ५४ लाखांचा दंड वसूल

१ जुलै २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत कारवाई

७,५१० किलो प्लास्टिक जप्त

१ कोटी ३५ लाख ५५ हजार दंड वसूल

४३ जणांना न्यायालयात खेचले

logo
marathi.freepressjournal.in