
उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या वाढत असताना प्रवासाच्या नियमांना देखील प्रवाशांकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. मध्य रेल्वेद्वारे एप्रिल-ऑगस्ट या पाच महिन्यांत विनातिकीट प्रवास करणाऱ्या २१.१९ लाख प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईद्वारे तब्ब्ल १४३.३७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेकडून आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतात; मात्र याचा गैरफायदा घेत विनातिकीट प्रवासी करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेत सर्व विभागांमध्ये तिकीट तपासणीच्या माध्यमातून विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने एप्रिल-ऑगस्ट २०२२ या कालावधीत तब्ब्ल १४३.३७ कोटींचा विक्रमी तिकीट तपासणी महसूल जमा केला आहे. केवळ ऑगस्ट महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या २.९२ लाख प्रकरणांमधून १७.१६ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. मागील वर्षी याच कालावधीतील ५७.८० कोटींच्या महसुलाच्या तुलनेत १४८.०२ टक्क्यांची वाढ झाली आहे.