मानखुर्दच्या भू-माफियांवर लवकरच कारवाई - डॉ. राजेंद्र भोसले

मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र यांच्याशी खास बातचीत
मानखुर्दच्या भू-माफियांवर लवकरच कारवाई - डॉ. राजेंद्र भोसले

मुंबई : मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेत शहरातील विविध प्रश्नांवर बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. यावेळी त्यांना मानखुर्द येथील आरक्षित केलेल्या भूखंडावरील अतिक्रमणांबद्दल विचारले असता, त्यांनी विशेष बैठक आयोजित करून भू-माफियांवर लवकरच कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. दरम्यान, या अतिक्रमणाची दखल घेत 'दै. नवशक्ति'ने आवाज उठवित याचा पाठपुरावा केला होता.

प्रश्न : मुंबई उपनगरासाठी विशेष काय करू इच्छिता?

उत्तर : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. इथे येणारा प्रत्येकजण स्वत:साठी डोळ्यांत मोठी स्वप्ने घेऊन येतो. पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी प्रचंड मेहनत करीत असतो. या अशा लोकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करता यावीत यासाठी मुंबई उपनगरातील लोकांचा चतुर्मुख विकास साधण्याचा माझा प्रयत्न असेल. मी माझ्या प्रामाणिक कामातून विकासाच्या बाबतीत मुंबई उपनगराला प्रथम स्थानावर आणू इच्छितोय. मुंबई उपनगराचा सर्वांगीण विकास साधत या शहराचा कायापालट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल.

प्रश्न : शहराची वाढती लोकसंख्या विकासाच्या आड येत आहे का ?

उत्तर : असं वाटत नाही. शासन असेल किंवा राज्य सरकार असेल या प्रकरणी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असून, त्यांच्या विकासासाठी एकत्र येत प्रयत्न चालू आहेत. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रश्नांवर सर्वच स्तरातील लोकांनी एकत्र येत तोडगा काढणे गरचेचे आहे.

प्रश्न : मानखुर्द येथे भूमाफियांनी दीड हजार कोटींच्या सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले आहे. यावर प्रशासन काय कारवाई करणार आहे?

उत्तर : ही जमीन रिटेल मार्केट आणि पार्किंग साठी आरक्षित जमीन असून, या जमिनीवर अनधिकृत इमले उभे राहिले आहेत. ते हटविण्यासाठी मी माझ्या कार्यालयात २० जून रोजी विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत उपजिल्हाधिकारी,अतिक्रमण विभागव इतर साऱ्या विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कडक कारवाई करण्याचे आदेश मी सर्व विभागाला दिले आहेत. तसेच या बैठकीत अतिक्रमण केलेल्या जागेचे तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश मी दिले आहेत.

प्रश्न : काही महिन्यांपूर्वी मालाड येथील अप्पापाड्यात आग लागली होती. या आगीतील उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाचे पुनर्वसन कधी करण्यात येणार आहे?

उत्तर : अप्पापाडयातील आगीत जखमी झालेल्या १०४१ लोकांना प्रतिव्यक्ति ५० हजारांची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. यात एका व्यक्ति गंभीर जखमी झाला होता. याचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत करण्यात आली. ही जमीन वनविभागाच्या अखरीत्यात येत असल्यामुळे येथील कुटुंबाच्या पुनर्वसनाबाबत ते योग्य तो निर्णय घेतील.

प्रश्न : तुम्ही जिल्हाधिकारी आहात आणि डॉक्टर ही, प्रशासकीय सेवेत येण्याआधी तुम्ही काही वेगळं करण्याचा विचार केला होता का ?

उत्तर : मी येथील सामान्य जनतेशी जोडला गेलेलो आहे. समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहचत त्यांच्यापर्यंत सोई-सुविधा पोहचवण्याचा माझा प्रयत्न असेल. या शहराच्या विकासाठी मी सदैव बांधील असून, मुंबई उपनगराचा कायापालट करण्यासाठी मी प्रयत्न करीत असून, हे प्रयत्न लवकरच तुम्हाला माझ्या कामातून दिसून येतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in