अमित ठाकरेंकडून कार्यकर्त्याला मारहाण; माथाडी कामगार नेते महेश जाधव यांचा आरोप

मनसे कार्यकर्ते आणि माथाडी कामगार यांच्यात मंगळवारी खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयाबाहेर मोठा राडा झाला.
अमित ठाकरेंकडून कार्यकर्त्याला मारहाण;
माथाडी कामगार नेते महेश जाधव यांचा आरोप

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मनसे नेते आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांच्यावर मारहाण केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. जाधव यांनी जखमी अवस्थेत स्वत: सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली.

मनसे कार्यकर्ते आणि माथाडी कामगार यांच्यात मंगळवारी खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयाबाहेर मोठा राडा झाला. माथाडी कामगार नेते महेश जाधव यांच्या समर्थक माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली. रुग्णालयाच्या परिसरातच माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी कामोठे येथील महेश जाधवांचं कार्यालय फोडले आहे.

महेश जाधव म्हणाले की, “माथाडी कामगार संघटनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मी राज ठाकरे यांच्या घरी गेलो होतो. तिथे मला अमित ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केली.” दरम्यान, या मारहाणीनंतर जाधव यांना खारघर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. “काही माथाडी कामगारांच्या मागण्या घेऊन मी अमित ठाकरे यांना भेटण्यासाठी राजगड (मनसेचे कार्यालय) येथे गेलो होतो. तिथे अमित ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा मित्र विनय अग्रवाल याच्या सांगण्यावरून मला मारहाण केली. हे ठाकरे मराठी माणसाचे कैवारी नाहीत, ते केवळ दलाल आहेत. केवळ खंडणी वसूल करणारा पक्ष आहे. या फेसबुक लाईव्हनंतर ते लोक माझा जीव घेतील, मला मारून टाकतील. मला काही झाल्यास राज आणि अमित ठाकरे हे दोघेच जबाबदार असतील,” असे महेश जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, या व्हायरल व्हिडीओनंतर मनसेने महेश जाधव यांच्यासह कामगार सेनेवर कारवाई केली आहे. “सर्व महाराष्ट्र सैनिकांना कळवण्यात येते की, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी कामगार सेना या संघटनेची आणि संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. मराठी कामगार सेना या संघटनेचा आणि पदाधिकाऱ्यांचा आजपासून मनसेशी संबंध नाही,” असे मनसेच्या पत्रात म्हटले आहे.

उलटसुलट उत्तरे दिल्यामुळेच मारहाण - संदीप देशपांडे

महेश जाधव यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. हा प्रकार घडला तेव्हा मी तिथे नव्हतो. परंतु, मला आमच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. अमित ठाकरेंकडे महेश जाधव यांच्या अनेक तक्रारी येत होत्या. कामगारांची फसवणूक करणे, कामगारांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी अमित ठाकरे यांनी बोलावले होते. परंतु, जाधव काही कामगारांना घेऊन तिथे गेले आणि अमित ठाकरे यांना उलटसुलट उत्तरे देऊ लागले. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले महाराष्ट्र सैनिक संतापले आणि त्यांनी महेश जाधव यांना मारहाण केली, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in