सुशांत सिंहची आत्महत्याच! सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये खुलासा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) शनिवारी क्लोजर रिपोर्ट दाखल केला.
सुशांत सिंहची आत्महत्याच! सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये खुलासा
Published on

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) शनिवारी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. सुशांतच्या मृत्यूनंतर तब्बल पाच वर्षांनी सीबीआयने मुंबईतील विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला असून सुशांतच्या आत्महत्येला कुणी जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सुशांतने आत्महत्या केल्याचे या क्लोजर अहवालातून समोर आले आहे.

“हा खून होता, हे सिद्ध करण्याइतपत कोणताही तोंडी किंवा भौतिक पुरावा आम्हाला सापडलेला नाही. सुशांतच्या बहिणीने त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे तिची चौकशी करण्यासाठी सीबीआयने इतके दिवस वाट पाहिली. पण ती सीबीआयसमोर हजर राहिली नाही. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात वैज्ञानिक पुराव्यांमधूनही कोणताही गैरप्रकार दिसून आला नाही, त्यामुळेच अखेर पाच वर्षांनी क्लोजर रिपोर्ट दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला,” असे सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी दाखल केली होती. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध त्याच्या कुटुंबियांनी कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी रियाला तुरुंगवास भोगावा लागला होता. मात्र नंतर रियाला क्लीन चिट देण्यात आली होती.

सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी सीबीआयने एम्सच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली होती. मात्र एम्सच्या फॉरेन्सिक टीमनेही सुशांतने आत्महत्याच केल्याचे स्पष्ट केले होते. सुशांतच्या चौकशीत त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारे कोणताही गुन्हेगारी कट किंवा गैरकृत्य उघड झाले नाही, असे सीबीआयच्या या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in