
मुंबई : अभिनेत्री हंसिका मोटवानी व तिची आई ज्योती मोटवानी या दोघींनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे. हंसिकाची नणंद मुस्कान जेम्स हिने हंसिका व तिच्या आईविरुद्ध दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंती याचिकेतून केली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांच्या खंडपीठाने याचिकेची दखल घेत ३ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली.
हंसिकाचा भाऊ प्रशांत मोटवानीने अभिनेत्री मुस्कान जेम्सशी डिसेंबर २०२० मध्ये विवाह केला. कालांतराने त्यांच्यात मतभेद झाले. मुस्कान जेम्सने डिसेंबर २०२२ मध्ये प्रशांतपासून अलिप्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये मुस्कानने हंसिका, तिची आई ज्योती आणि भाऊ प्रशांत मोटवानी यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने मोटवानी कुटुंबीय अडचणीत सापडले. दरम्यान हंसिका व तिच्या आईने सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने फेब्रुवारीत अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.